बारामती : महान्यूज लाईव्ह
पंधरा दिवसाच्या कडकडीत लॉकडाऊन नंतर बारामतीतील कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने खालावताना दिसत आहे. परवा बारामतीत 213 जण कोरोना बाधित आढळून आले होते, तर काल 158 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. अर्थात बारामतीतील मृत्यूचे प्रमाण मात्र अजूनही चिंताजनक आहे. परंतु बारामतीकरांनी निर्धाराने कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी रोखण्यात यश मिळवले आहे, हाच सध्या चा आजचा मतितार्थ आहे.
बारामतीत रविवारी फक्त 54 रुग्ण आढळले होते. त्याचे कारण म्हणजे बारामतीमध्ये रविवारी शासकीय तपासणी केंद्रावरील आरटीपीसीआर तपासणी होत नाही. त्यामुळे त्या दिवशी फक्त खाजगी प्रयोगशाळांमधील तपासणी झाली. यामध्ये 181 जणांची तपासणी झाली आणि त्यामध्ये 54 जण कोरोना बाधित आढळून आले होते. मात्र तो दिलासा नव्हता, सोमवारी काय होईल याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष होते.
सोमवारी 17 मे रोजी बारामतीत शासकीय केंद्रावर 723 जणांची तपासणी झाली. खाजगी प्रयोगशाळेत तब्बल 205 जणांची तपासणी झाली. थोडक्यात बारामती मध्ये एकूण 928 जणांची तपासणी झाली होती. त्यामध्ये 209 जण कोरोना बाधित आढळून आले, म्हणजेच हे प्रमाण मागील पंधरवड्याच्या तुलनेत बऱ्यापैकी घसरले होते.
त्यानंतर 18 मे रोजी झालेल्या तपासणीमध्ये शासकीय केंद्रावर 629 जणांची तपासणी झाली, तर खाजगी प्रयोगशाळांमध्ये दोन्ही प्रकारच्या तपासण्या मिळून 267 जण जणांची तपासणी झाली. यामध्ये एकूण 188 जण कोरोना बाधित आढळून आले, तर मेखळी, मूर्टी आणि सोनकसवाडी या तीन गावांमध्ये रॅपिड अँटीजेन तपासणीचे शिबिर घेण्यात आले होते. त्यामध्ये 253 जण संशयित आढळून आले होते, त्यांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये 25 जण कोरोना बाधित आढळून आले होते. त्यामुळे त्या दिवशी एकूण 213 जण कोरोना बाधित आढळून आले.
काल म्हणजे 19 मे रोजी झालेल्या तपासण्यांमध्ये शासकीय केंद्रावर 536 जणांची तपासणी झाली. खाजगी प्रयोगशाळांमध्ये 339 जणांची तपासणी झाली. त्यामध्ये 158 आढळून आले आहेत. अद्यापही 38 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत, या 158 बरोबर इतर तालुक्यातील 11 जणांचा देखील समावेश आहे. परंतु एकंदरीत विचार करता बारामतीतील रुग्ण संख्या झपाट्याने खालावत आहे असे म्हणता येईल.
अर्थात आता बारामती अंशतः अनलॉक झालेली आहे. अशा वेळी पुन्हा बारामतीकरांनी गर्दी केली, बारामती तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली, तर कोरोना दबा धरून बसलेला आहे. तो पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे आता रोखलेली लाट अशीच नियंत्रणात ठेवून हळूहळू ती पूर्ण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.











