खंडाळा : महान्यूज लाईव्ह
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सध्या नैसर्गिक मृत्यूच्या अंत्यसंस्कारालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक मृत्यूच्या अंत्यसंस्कारालाही नातेवाईकांसह नागरिक पाठ फिरवत असल्याने नैसर्गिक मृत्यूच्या अंत्यसंस्काराला अगदी खांदेकरीही येईनात अशी परिस्थिती सध्या खंडाळा तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात माणुसकी हरवली आहे कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे सध्या अश्या संकटाच्या काळात जातीभेद न मानता तरुणाई पुढे सरसावली असून अंत्यसंस्कारालाही पुढे सरसावत संपूर्ण विधी त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे पार पडत माणुसकीचा धर्म पाळत आहे. कोरोना रोगाशी सध्या सातारा जिल्हा प्रशासनासह संपूर्ण यंत्रणा युद्ध लढत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या दररोजची कोरोना रूग्णांची आकडेवारी व मृत्यू दरही वाढत आहे. सध्या रुग्णालयापुढेही चित्रपटगृहांप्रमाणे हाऊस फुलचे बोर्ड दिसत आहे. सध्या कोरोना परिस्थितीमध्ये कोरोनाची दहशत एवढी आहे की, कोणाच्याही मृत्यूची वार्ता मिळताच आपसूकच नागरिकांच्या तोंडात एकच शब्द निघताना दिसत आहे, तो म्हणजे कोरोना रोगाने आणखी एक बळी गेला.
दरम्यान,सध्याची भयानक परिस्थिती पाहता एखाद्या नागरिकांचे नैसर्गिक अर्थात हृदयविकाराने,वृद्धापकाळाने, अपघातामध्ये अथवा कोणत्याही नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास नागरिकांच्या व नातेवाईकांच्या काळजात धस्स होत असून संबधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला जाणे टाळण्यासाठी सध्या विविध कारणे नातेवाईकही शोधत आहेत. विशेष म्हणजे एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूची वार्ता दूरध्वनीद्वारे समजल्यानंतर दुसरीकडून घरामध्ये कोरोना रुग्ण हा पॉजिटीव्ह नसला तरी किंवा शेजारी कोरोना रुग्ण आढळल्याने घराचा परिसर प्रतिबंधित क्षेञ म्हणून घोषित करण्यात आला असल्याची जुजबी माहिती देत नैसर्गिक अंत्यसंस्कारालाही जाणे टाळत आहेत.
विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या घराकडेही एरवी दाहिदिशा भटकंती करणारे नागरिक अथवा नातेवाईक जाणे टाळत असल्याने नैसर्गिक मृत्यूच्या अंत्यविधीलाही खांदेकरी मिळत नसल्याचे चिञ दिसत आहे.त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाला ताटकळत थांबवावे लागत असल्याने मृत्यूनंतरही मरणयातनाचा ञास सध्या मृतदेहांना करावा लागत आहे. याच अनुषंगाने शिरवळमधील तरुणांनी एकञित येत जातीभेदाची दारे मोडत ज्याठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण होईल त्याठिकाणी एक पाऊल अंत्यसंस्कारांकरीता पुढे टाकत मृतदेहांवर रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार पार पाडण्यास सुरवात केली आहे.
यामध्ये शिरवळचे माजी उपसरपंच आदेश भापकर,सामाजिक कार्यकर्ते उमेश गिरमे, काका राऊत, रविराज दुधगावकर, दिपक मगर यांच्यासह शहिदभाई तांबोळी, साहिल काझी, समीर काझी, आसिफभाई मुजावर, जावेद बागवान, रमेश चव्हाण, सुनिल चव्हाण व पञकार मुराद पटेल, पिंटू दळवी असे सार्वजनिक शिवमहोत्सव समिती व 786 युथ क्लबच्या माध्यमातून आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान,एकीकडे वैकुंठ गमन करणा-या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारालाही नातेवाईकांनी पाठ फिरवल्यानंतरही अंतिम क्षणी युवक वर्ग धाडसाने अंत्यविधीकरीता पुढे येत असल्याने विविध स्तरातून कौतूक होत आहे.
आदेश भापकर – माजी उपसरपंच,शिरवळ कोरोनाच्या काळात सध्या संपूर्ण जग ञस्त आहे.नैसर्गिक मृत्यूलाही सध्या नागरिक साशंकतेने पाहताना दिसत असून त्याअनुषंगाने धर्माच्या पलीकडे जात तरुणाईने पुढे येत धाडस दाखवित आपले कर्तव्य पार पाडत आहे.
असिफभाई मुजावर – सामाजिक कार्यकर्ता, शिरवळ सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अंत्यविधी करताना मृत झालेल्या व्यक्तींच्या कुंटूंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे माणूसकीच्या दृष्टीने व सर्वधर्मसमभावाची भावना निर्माण होण्याकरीता व या जगामध्ये कोण राहण्याकरीता आलेले नाही. मृत्यू हे सगळ्यांना अटळ आहे, त्यामुळे सगळ्यांना या जगाचा कधी न कधी निरोप घ्यायचा असून केवळ माणूसकीचे नाते निर्माण होण्याकरीता त्या अनुषंगाने हे कर्तव्य पार पाडत आहेत.











