खंडाळा : महान्यूज लाईव्ह
भारतीय हवामान विभागाने 15 मे ते दि. 17 मे पर्यंत कोकण किनारपट्टी वरुन चक्रीवादळ जाणार असल्याचे वर्तवले आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा वाहून महावितरणच्या विज वितरण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वीजप्रणालीची पडझड/नुकसान होऊ शकते. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी कोणीही पडलेले खांब, तुटलेल्या तारा असतील, तर जवळ जाऊ नये अथवा स्पर्श करू नये, तसेच त्या परिसरात ओलसर भाग असेल तर तेथे काळजी घ्यावी असे आवाहन उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी यांनी केेले आहे.
आज सकाळी पासून ज्या काही विद्युत पुरवठ्याच्या तक्रारी आहेत, त्या याच वादळामुळे आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करणेसाठी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी सदैव तत्पर असतीलच. परंतु चक्रीवादळाचा वेग जास्त असल्यास महावितरणच्या खांब व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते व त्या वेळेस विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास विलंब लागू शकतो असे गोंजारी यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच महावितरण चे खांब कोसळलेस किंवा विद्युत वाहक तारा तुटून पडल्यास विद्युत वाहक तारांच्या संपर्कात मनुष्य अथवा जनावरे येऊन प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी आपल्या आसपास कुठेही महावितरणचे खांब अथवा तारा तुटून पडल्यास त्याच्या संपर्कात येऊ नये व इतर कोणास येऊ देऊ नये. असे कोठे आढळून आल्यास त्याची माहिती त्वरीत आपल्या भागामध्ये नेमणुकीस असणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यास अथवा अभियंत्यास अथवा उपकेंद्रास द्यावी. जेणेकरून आपण एखादी दुर्दैवी अपघाती घटना टाळू शकतो. असे आवाहन उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी यांनी केले आहे.











