तात्यांच्या जाण्याने सर्वसामान्य जनतेची वकिली करणारा पालक हरपला…. .
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
रत्नाकर मखरे तात्या शोषित, वंचित, पिडीत वर्गाचे आधारवड होते,अशी भावना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मल्हारी मखरे यांचे निधन झाले.त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम संस्थेच्या भिमाई आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी भरणे बोलत होते.
रत्नाकर मखरे यांचे थोरले सुपुत्र ॲड. राहूल मखरे यांनी तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वडील रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर बौध्दाचार्य बाळासाहेब धावारे यांनी बौध्द धर्मानुसार विधिवत पूजा केली. उपस्थितांनी दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहिली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रत्नाकर मखरे यांच्याप्रती भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, रत्नाकर मखरे तात्या शोषित, वंचित, पिडीत वर्गाचे आधारवड होते. तात्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध होते. संस्थेच्या कार्यकारी मंडळावर माझी विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती केली. याचा मला विशेष आनंद झाला होता. समाजहिताची कामे करणाऱ्या आणि खऱ्या माणसाची पारख खऱ्या अर्थाने तात्यांना होती. तात्या स्वतःच्या कुटुंबाइतकेच प्रेम आपल्या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलांवर व संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करत होते. त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य जनतेची वकिली करणारा पालक हरपल्याची भावना जनमानसात आहे. तात्या स्वतः पेक्षा इतरांची जास्त काळजी घेत असतं. यापुढे ॲड. राहूल मखरेंचा मोठा भाऊ म्हणून आपल्या सोबत असून साथ देईल.
माझ्या चांगल्या कामाची प्रशंसा करणारा ,माझ्या सुख दुःखाच्या व अडीअडचणीच्या प्रसंगी साथ देणारा आधार आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना श्रद्धांजलीपर भाषणात राज्यमंत्री भरणे यांनी व्यक्त केली.
यावेळी पोपट पवार, कैलास चव्हाण, कैलास कदम, शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, प्रा.अशोक मखरे, ॲड.समीर टिळेकर, ॲड. बापूराव साबळे, मोरे, अरविंद वाघ आदींनी रत्नाकर मखरे यांना श्रद्धांजली वाहिली.
बामसेफ नवी दिल्ली चे राष्ट्रीय महासचिव प्रा.डी.आर.ओहोळ यांनी रत्नाकर मखरे यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय कार्याचा लेखाजोखा आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला. यावेळी “पंढरीचा पांडुरंग कोण” ? प्रा.विलास खरात लिखित पुस्तकाचे कार्यक्रमस्थळी वाटप करण्यात आले. तसेच आठवणीतील रत्नाकर मखरे तात्या/ लढवय्या तात्या ह्या पुस्तकाचे प्रकाशन तात्यांच्या स्मृतिदिनी करण्यात येईल. असे यावेळी जाहीर करण्यात आले.
पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्थेचे पदाधिकरी व संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.











