राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे जिल्ह्यात टरबुज पिकांच्या उत्पादनांमध्ये अग्रेसर असलेल्या दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील शेतक-यांना बोगस कंपनी आणि बोगस कंपनीच्या टरबुज बियाणांचा मोठा फटका बसला आहे. टरबुज, खरबुज लागवड केलेल्या तब्बल 60 ते 70 शेतक-यांना यंदा टरबुजचे उत्पादन निघाले नाही. परिणामी लाखो रूपये खर्च करून शेतजमिनीत लागवड केलेल्या टरबुज उत्पादकांचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याने टरबुज उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
संबंधित कंपनीने बोगस आणि खराब बियांणे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी आणि दौंड पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडे लेखी तक्रार देऊन केला आहे.
गेली कित्येक वर्षांपासून पुणे जिल्ह्यात टरबुज आणि खरबुज पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून दौंड तालुक्यातील बोरीबेल गावची ओळख आहे.
बोरीबेल येथील बहुतांश शेतकरी हे उन्हाळ्यात टरबुज, खरबुज आणि कलिंगड या पिकांची लागवड करीत असतात. दरवर्षी टरबुज,खरबुज व कलिंगडामधून लाखो रूपयांची उलाढाल होत असून शेतक-यांना चांगला बाजार दर मिळत असल्याने लाखो रुपयांचा नफा मिळतो. यंदाही या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दरवर्षी ज्या कंपनीकडून बियाणे खरेदी करतात, त्याच कंपनीकडुन टरबुज आणि खरबुज बियाणे घेऊन पिकांची लागवड केली.
लागवड केल्यानंतर काही दिवसांनी टरबुजाच्या वेलाला पाला आला, वेल हिरवीगार दिसू लागले.
मात्र लागवड केल्यानंतर काही दिवसातच वेलावरील पाला पिवळसर पडू लागला, तर फळे काढण्यापुर्वीच ती जागेवरच नासून खराब होवून गळू लागली. शेतकऱ्यांनी या पिकांवर संबंधित कंपनीने सांगितल्याप्रमाणे विविध औषधांची फवारणी केली.
मात्र तरीही टरबुज या फळांना भरीवपणा आला नाही ती वाळून जागेवर गळुन गेली. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित बियाणे विक्रेते व कंपनीशी संपर्क साधला. मात्र त्यांनी उडावउडावीचे उत्तर देत रोगांमुळे टरबुजांचे पिके खराब होत असल्याचे उत्तर दिले. यामुळे टरबुज उत्पादकांनी दौंड कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी तक्रार केली.
याबाबत टरबुज उत्पादक शेतकरी रमाकांत पाचपुते म्हणाले की, दरवर्षी आम्ही टरबुज पिकांची लागवड करतो. सुमारे 20 ते 30 टन एकरी उत्पादन दरवर्षी निघते. मात्र यंदा कंपनीने बोगस आणि भेसळयुक्त बियाणे दिल्याने आम्हाला अगदी 40 किलो देखील खरबुज आणि टरबुजाचे उत्पादन निघाले नाही. बोरीबेल येथील 60 – 70 शेतकऱ्यांनी एकाच कंपनीकडून ही बियाणे घेतली आहेत. एक एकर ते पाच एकरांवर शेतकऱ्यांनी टरबुज पिकांची लागवड केली, मात्र या सर्व शेतक-यांची एक कॅरेट ही टरबुजाचे उत्पादन निघाले नाही,.
कंपनी ने फसवणूक केली आहे. यामुळे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबात आम्ही कृषी विभाग, मंडल अधिकारी,तलाठी, ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी तक्रार केली असून नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी केली आहे.
दरम्यान, याबाबत कृषी मंडल अधिकारी महेश शिंदे म्हणाले की, बोरीबेल येथील शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. नुकसान झालेल्या टरबुज या पिकांची तंज्ञ कृषी शास्त्रज्ञ यांच्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या पिकांचे नुकसान हे बोगस बियाण्यांमुळे झाले की रोगांमुळे झाले हे स्पष्ट होईल. बारामती येथील कृषी शास्त्रज्ञ आणि संबंधित कंपनीचे अधिकारी यांना याबाबत पत्रव्यवहार केला असून स्थळ पाहणी करून पंचनामा केला जाईल.











