माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – अरबी समुद्रातील तॉकत्ये चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील असलेल्या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील दुर्गम भागातील तसेच उघड्या माळरानावर वसलेल्या झोपड्यांतील कातकरी समाजातील कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी प्रशासनाने हलविले आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तॉकत्ये चक्रीवादळ घोंगावत असल्याच्या पार्श्वभूमीवर नसरापूर येथील मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी यांनी नसरापूर, चेलाडी फाटा, सांगवी निधान या परिसरातील कातकरी समाजातील ग्रामस्थ महिला, लहान बालके यांना शिवाजी महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
वातावरण आटोक्यात येईपर्यंत त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून, नसरापूर ग्रामपंचायतीमार्फत जेवणाची व्यवस्था होणार असल्याची माहिती यावेळी तलाठी जे. डी. बरकडे यांनी दिली आहे.
दरम्यान, वेधशाळेने या वादळाने ‘व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचं जाहीर केलेले असून इन्सॅट उपग्रहानं काढलेला हा फोटो भारतीय हवामान खात्यानं शेअर केला आहे. यात चक्रीवादळाचा केंद्रबिंदू (चक्रवाताचा डोळा) ठळकपणे दिसून येतो आहे.
तर त्याच्या लांब सर्पिलाकृती भुजा जमिनीवर दूरवर पसरलेल्या दिसत आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हे चक्रीवादळ घोंगावत असून (१६ मे) दुपारी या चक्रीवादळानं आणखी रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.











