पुणे : महान्यूज लाईव्ह
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनाची झुंज अखेर अपयशी ठरली. आज उपचारादरम्यान पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजीव सातव मागील 23 दिवसापासून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दाखल होते. उपचारादरम्यान त्यांना व्हेंटिलेटरची ची गरज भासली. गेली काही दिवस व्हेंटिलेटरवर होते.
19 एप्रिल रोजी सातव यांना कोरोनाची लक्षणे आढळली. 23 एप्रिल पासून पुण्यामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यापूर्वी त्यांची प्रकृती गंभीर होती, मात्र काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती दिली होती.
राजीव सातव यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2014 मध्ये लोकसभा सदस्य तर मागील वर्षी राज्यसभा सदस्य बनले. 2010 ते 2014 या काळात त्यांनी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शोक व्यक्त केला.











