इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या कठीण काळात इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात रुग्णांसह नातेवाईकांना मानसिक आधार देत प्रामाणिकपणे काम करणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांना वैद्यकीय सेवेसाठी मुदतवाढ देण्यात यावी,अशी मागणी मातंग एकता आंदोलनाचे तालुकाध्यक्ष संतोष आरडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र कोरोना मुक्त होण्यासाठी या महाविकास आघाडी सरकारने प्रमाणिकपणे काम केले आहे. इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे हे सेवेतून 31 मे रोजी निवृत्त होत आहेत.
डॉ.चंदनशिवे हे गेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांवर फक्त वैदकीय उपचार करून थांबले नाहीत, तर रुग्ण व नातेवाईक यांना मानसिक आधार देण्याचे काम देखील केले आहे. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाची सेवा केली असून ते सर्वसामान्य नागरिकांना देवदूत वाटत आहेत. सध्या इंदापूरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा कठीण काळात उपजिल्हा रूग्णालयात डॉ. चंदनशिवे यांची गरज आहे. कोरोनाचा कहर संपेपर्यंत डॉ. चंदनशिवे यांना मुदतवाढ द्यावी, अशी विनंती संतोष आरडे यांनी केली आहे.











