दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे व गावातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील हाँटेलांचे हब असलेले वेळे (ता. वाई) गाव ३१ मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय कोरोना दक्षता समितीने घेतला आहे.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. वेळे येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गावात तब्बल २० जणांचा बळी या कोरोनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामदक्षता समितीने कडक धोरण राबवत गाव बंद करण्याचा निर्णय घेतला.
गावातील किराणा माल, दुध डेअरी, कपडयांची दुकाने, चिकन, मटण दुकाने, सलुन, चपल्यांचे दुकान, डंक, टेलरिंग दुकान, पतसंस्था आदी व्यवसाय संपूर्ण बंद करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या. तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास साथरोगाच्या अधिसुचना लागु असेपर्यंत संबंधित व्यावसायिकाचा परवाना रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तशा आशयाची पत्रे संबंधित व्यावसायिकांना देण्यात आली आहेत. तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता वेळे ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय स्तुत्यच असून मागीलवर्षी प्रमाणे या वर्षीही ग्राम दक्षता समित्यांनी ग्रामस्थांचे जीव वाचविण्यासाठी कडक धोरणांची अंमलबजावणी करण्याची गरज होती. त्यामुळे वेळे गावाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
वेळे हे जिल्ह्यातील हाँटेलचे हब मानण्यात येते. एका ठिकाणीच विविध प्रकारची हाँटेल येथे आहेत. ती बंद राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान होणार असले तरी हा निर्णय घेतल्याने गावातील कोरोनाचा विळखा कमी होण्यास मदत होणार आहे.











