वाई : महान्यूज लाईव्ह
मुंगसेवाडी (ता.वाई) येथील पोलिस पाटील दिपक बबन निकम यांच्यावर हल्ला करणार्या व्यक्तींवर कलम 353 व 326 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील एकीकरण समिती वाई शाखेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुंगसेवाडी येथील पोलीस पाटील दिपक निकम यांच्यावर 8 मे रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करीत असून गाव पातळीवर पोलीस पाटील चोवीस तास कर्तव्यावर असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य तो इमाने इतबारे करीत असतो. असे असताना त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांना निर्भयपणे कर्तव्य बजावता यावे यासाठी शासनाने त्यांच्यावर हल्ला करणार्यांसाठी कलम 353 लागू करून पोलीस पाटील यांना संरक्षण प्रदान केले आहे.
दिपक निकम हे गावात कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीसोबत नालेसफाई व निर्जुंतुकीकरण करीत असताना व ते या समितीचे सदस्य असताना ते कर्तव्यावर असताना त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला. राजकीय शक्ती पाठीशी असल्याने अशांवर फक्त गुन्हे दाखल होतात, पण कारवाई होत नाही. अशी मानसिकता हल्लेखोरांची झाली असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढू लागले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार आहे. त्यामुळे कायदा हातात घेणार्या व्यक्तींवर कडक कारवाई करून त्यांना लगाम घालावा. संबंधितांवर कलम 353 व कलम 326 अन्वये गुन्हा दाखल करून प्रशासन पोलीस पाटील यांच्या पाठीशी उभे असल्याचे कृतीतून दाखवून द्यावे, असे आवाहनही निवेदनात केले आहे.











