दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात बिबट्यांचं जणू एक कुटुबं ठाण मांडून बसले आहे. नदीकाठालगतच्या गावांसह परिसरातील गावांमध्ये बिबट्याचे वास्तव वाढू लागले असून आज तालुक्यातील उंडवडी येथील सौंदडवाडी भागात एका शेतकऱ्याला उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसराला भेट देवून पाहणी केली आहे. दरम्यान, घाबरू नका, काळजी घ्या, बिबट्या आढळ्यास त्वरीत वनविभागाशी संपर्क साधा असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण, नानगाव, पारगाव तसेच राहू बेटातील काही गावांमध्ये बिबट्या अनेक शेतकऱ्यांना यापुर्वी दिसला आहे. बिबट्याचे कुटूंबच तालुक्यात वावरत आहे. बिबट्यांनी शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करून, त्यांना भक्ष्य केल्याची घटना यापुर्वी अनेकदा घडली आहे.
बिबट्या एका जागी वास्तव करीत नसल्याने तो अन्न पाण्याच्या शोधत भटकंती करत आहे. तालुक्यातील उंडवडी परिसरातील सौंदडवाडी येथील शेतकरी विष्णु गवळी आणि अमित गवळी हे शेतात काम करत असताना त्यांना बिबट्या दिसल्यावर परिसरात खळबळ उडाली.
बिबट्या पाहताच त्यांनी तातडीने सरपंच दिपमाला जाधव यांच्या संपर्क साधला.
वनविभागाचे वनरक्षक नाना चव्हाण यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केला असता त्यांना उसाच्या शेतात बिबट्याचे ठसे असल्याचे निदर्शानास आले. अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाचे बिबट्या असल्यांचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला. दरम्यान, या परिसरात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामंपचायत प्रशासनाने वनविभागाकडे केली आहे.











