महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
जगप्रसिध्द लॅन्सेट नियतकालिकाने भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याची वस्तुस्थितीचा पोलखोल केल्यानंतर देशभऱात खळबळ उडाली आहे. मागील २४ तासात ४ लाखांहून अधिक रुग्ण पुन्हा आढळल्याने व गेल्या वर्षभरात सर्वाधिक ४ हजार ९२ मृत्यू एकाच दिवसात आढळल्याने मोदी सरकारवर टिकेची झोड उठली आहे.
कुंभमेळा, निवडणूका यांच्यामुळे कोरोनाची दुसरी लाट अधिकच उसळली असून उत्तराखंड सारख्या शांत व विरळ लोकवस्तीच्या राज्यातही एकाच महिन्यात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ कोटी २२ लाखांवर पोचली असून उत्तराखंडमध्ये शासकीय सूत्रांच्या आकडेवारीनुसार १२० लोकांचा एकाच दिवसात मृत्यू झाला आहे.
लॅन्सेट ही जगप्रसिध्द संशोधन व प्रसार नियतकालिक असून यामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याऐवजी विरोधकांची तोंडे बंद करण्याचा मोदी सरकारने प्रयत्न केला. ज्यांनी मोकळेपणे बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचाही आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालय अजूनही सुस्त असल्याचा आरोप याआधीच इंडीयन मेडीकल असोसिएशनने केला होता व देशभऱात लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला होता. मात्र आरोग्य मंत्रालयाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यातच आता लॅन्सेटने वर्मावर बोट ठेवले आहे.
ज्यावेळी कोरोनाची दुसरी लाट भारतात हातपाय पसरत होती, त्यावेळी मोदी सरकार निवडणूकांमध्ये व्यस्त होते आणि जे कोणी वास्तव स्थिती लक्षात आणून देत होते, त्यांना विरोधक ठरवून सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत होते. असा ठपकाही या संशोधनपर नियतकालिकात ठेवण्यात आला आहे.











