दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील घटना…
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील कांदा उत्पादक शेतकरी नाना जगताप यांच्या कांद्यांच्या वखारीला अज्ञात व्यक्तीने व्यक्तीगत रागातून आग लावल्याच्या घटना घडली. या आगीत वखारीतील सुमारे 55 टन कांदा जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. यामुळे कृषी साहित्य आणि कृषीची संबंधित वस्तुंमुळे शेतकरांना वेळेवर बी-बियाणे, खते मिळत नाहीत. त्यातच महावितरण कंपनीकडून सतत जाणारी लाईट यामुळे शेतीपिकांना पाणी देता येत नाही. या संकटाचा सामाना शेतकरी करीत आहेत. कोरोनाच्या संकटात असताना ही जमिनीच्या वादाच्या घटना घडत आहेत. बांधाचे वाद, रस्त्यांचे वाद यातून शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशा अनेक तक्रारी घेवून शेतकरी पोलीस चौकीची पायरी चढत आहेत. यातच आता तालुक्यातील कासुर्डी येथे कांद्याच्या वखारीला आग लावून दिल्याची धक्कादायक कृत्य केल्याची घटना घडली आहे.
कासुर्डी येथील शेतकरी नाना जगताप यांनी आपल्या कांद्याला चांगाल बाजार दर मिळेल या अपेक्षेने घरापासून काही अंतरावर वखार तयार करून त्या वखारीत कांदा सुरक्षित ठेवला होता. मात्र काही अज्ञात व्यक्तींनी जगताप यांची कांद्याची वखार पेटवून दिली. यामुळे या वखारीला भीषण आग लागल्याने 55 टन कांदा आणि वखार जळून खाक झाली. यामध्ये अंदाजे ९ लाख रुपयांच्या आसपास नुकसान झाले असल्याचे शेतकरी नाना जगताप यांनी सांगितले.
याबाबत जगताप यांनी यवत पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. तर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कृषी सहाय्यक स्नेहल थेऊरकर यांनी घटनास्थळाची पाहणी करीत नुकसानीचा पंचनामा केला आहे. हा पंचनामा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी जगताप यांनी केली आहे.











