बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी यासाठी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून मागणी केली आहे.
सध्या देशात व राज्यात सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असून यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे शंभर हून अधिक पत्रकारांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्या पत्रकारांच्या कुटुंबियांना अद्याप पर्यंत शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. मराठी पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक दिवस या प्रश्नासाठी राज्यभर विविध आंदोलनं सुरू आहेत. गेल्या महिन्यात मेल पाठवली, तर दोन दिवसांपूर्वी राज्यभर आत्मक्लेश आंदोलन पार पडले. यावेळी राज्यातील 300 पेक्षा जास्त तालुक्यातून पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते.
या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान रिलीफ फंड, व पंतप्रधान कार्यालयात ई-मेल द्वारे हा प्रश्न मांडला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याशिवाय पुण्याचे जिल्हाधिकारी यांना ही ई-मेल करत तालुक्यातील पत्रकारांसाठी शासकीय रुग्णालयात बेड आरक्षित करून औषध उपचार मिळणेकामी सहकार्य करावे अशी मागणी केली आहे.











