माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर : कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने तालुकास्तरावर ठिकठिकाणी पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू केली आहे. मात्र अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या धांगवडी येथील कोविड केअर सेंटरला तहसिलदार अजित पाटील यांनी तातडीची भेट देऊन बाधित रुग्णांची समस्या जाणून घेतल्यानंतर तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना संबधिताना दिल्या आहेत.
धांगवडी ( ता.भोर ) येथे तोरणा विद्यार्थी गृहात कोरोना रुणांवर उपचार सुरू असून येथील कोविड सेंटर समस्यांच्या विळख्यात अडकले असल्याची तक्रार होऊ लागल्याने सोमवारी तहसीलदार अजित पाटील यांनी भेट दिली. यावेळी गटविकास अधिकारी विशाल तनपूरे, सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहूनाना शेलार, मंडलाधिकारी मनीषा भुतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना दरेकर, राहुल खामकर, ग्रामसेवक पुरोहित, तलाठी सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते.
कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची तहसीलदार अजित पाटील यांनी आपुलकीने विचारपूस करत समस्या जाणून घेतल्या. रुग्णांनी समस्या मांडताना सेंटरच्या इमारतीत सात दिवसांपासून कचरा उचलला जात नाही. खोल्यांचे निर्जंतुकीकरण केले जात नसून कॅन्टीनमधून रुग्णांसाठी येणारा चहा थंड दिल्याने अनेकवेळा चहा वाया जातो अशा तक्रारी केल्या.
रुग्णांना मिळत असलेला नाष्टा थंड व बेचव असतो. तसेच प्लॅस्टिक पिशवीमध्ये अर्धवट शिजवलेले व निकृष्ट पद्धतीचे जेवण आणि चहा दिला जातो. तसेच सफाई कामगार येत नसल्याने होणारी धूळ, केरकचरा यामुळे अस्वच्छता पसरत असून अनेकवेळा परिचारीका वेळेवर सलाईन सुद्धा बंद करत नसल्याचे रुग्णाने पाटील यांच्याकडे तक्रार केली.
यावेळी तहसीलदार अजित पाटील यांनी तत्काळ संबधिताची कानउघाडणी करून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे तंबी दिली. तसेच जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यांना रूग्णांना योग्य प्रमाणात व सकस आहार देण्याच्याही सूचना केल्या.











