बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवानगी दिली असून त्यापैकी २४ हजार ४८६ उद्योग सुरू झाले असून राज्यात ६.५० लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
राज्यातील उद्योग प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये ते बोलत होते. उद्योग सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबलगम, उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, एम सी सी आय ए चे अध्यक्ष प्रदीप भार्गव, प्रशांत गिरबने, दिपक करंदीकर, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, डायनामिक्सचे जितेंद्र जाधव, सुरेश ऑटो चे मनोज इंगळे, पणदरे एमआयडीसी मधील महिला उद्योजिका उज्वला गोसावी आदी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.
यावेळी देसाई म्हणाले,`लॉक डाऊन कालावधीत उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर उद्योग प्रत्यक्ष सुरू होत सुरू झालेले आहेत ही अतिशय समाधानाची बाब आहे. उद्योगांना आकारला जाणारा विजेचा स्थिर आकार लाॅकडाऊन कालावधीसाठी रद्द करण्यात आलेला आहे, केवळ प्रत्यक्ष वीज वापर बिल भरावे लागेल, एमआयडिसी भूखंडावरील बांधकामांना मुदतवाढ परवानगी निशुल्क दिली जाईल, चीन मधून उद्योग बाहेर पडण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हे उद्योग राज्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असून आता लघु उद्योगांनी त्यांचे पुरवठादार म्हणून काम करण्यासाठी सज्ज राहावे.`
या बैठकीत बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सीजीटीएमएस या कर्जहमी योजनेची मर्यादा दोन कोटी वरून पाच कोटी पर्यंत वाढवावी, उद्योगांना सवलतीच्या दरात सुलभ कर्ज उपलब्ध करावे, उद्योगांनी वसूल केलेली जीएसटी रक्कम काही महिने बिनव्याजी वापरण्यासाठी द्यावी, परकीय गुंतवणूक प्राधान्याने महाराष्ट्रात होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी केली.










