दौंड : महान्यूज लाईव्ह दौंडमधील राज्य राखीव दलाच्या पंधरा जवानांचा कोरोना विषाणूचा वैद्यकीय अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी तपासणी करण्यात आलेल्या 95 जवान पैकी सहा जणांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी होते. या सहा जवनांचे वैद्यकीय अहवाल आज प्राप्त झाले असून या जवानांचा कोरोना विषाणूचा वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीदरम्यान राज्यातील मुंबई येथे बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव बल गट क्र ७ च्या 95 जवानांची एक तुकडी काही दिवसापुर्वी दौंड येथे दाखल झाली होती. या सर्व जवानांची कोरोना विषाणूची तपासणी केली असता यातील 15 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते तर 74 जवानांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र सहा जवानांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी होते. या सहा जवानांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले असून सर्व जवान निगेटिव्ह आहेत.
या अहवालामुळे दौंड करांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरीही योग्य ती खबरदारी व दक्षता घेत नागरीकांना घरात थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











