इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारच्या खांद्याला खांदा लावून स्वयंस्फूर्तीने कोरोना योध्दे तयार होत असतानाच आरोग्य खात्यातीलच एका महिला कर्मचाऱ्यानेही आज लक्ष वेधले..बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात महिन्यापूर्वी नियुक्ती झालेल्या मिनाक्षी निंबाळकर या महिला आरोग्य कर्मचाऱ्याने पहिला पगार आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दिला. पगाराच्या रकमेतून मास्क खरेदी करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी मदत करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचे आज राजकीय पदाधिकाऱ्यांनीही कौतुक केले.
मिनाक्षी पुष्पराज निंबाळकर या सणसर (ता. इंदापूर) येथील रहिवासी असून त्यांचे पती पुष्पराज निंबाळकर हे देखील आरोग्य खात्यात कार्यरत आहेत. डेंग्यू निर्मूलनाचा सणसर पॅटर्न तयार करण्यात व राबविण्यात त्यांचा पुढाकार मोलाचा होता. त्यांच्याच पत्नी मागील महिन्यात बारामतीत सरकारी दवाखान्यात रुजू झाल्यानंतर कोरोनाचे सावट भलतेच वाढू लागले होते. त्यातच मिनाक्षी स्वतः मधुमेहाच्या रुग्ण आहेत. मात्र कोणत्याही स्थितीत आरोग्यसेवा करायची या हेतूने प्रेरीत झालेल्या निंबाळकर यांनी त्यांची सेवा सुरू ठेवली व पहिला पगार आपल्याच विभागातील सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी देण्याचे ठरवले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी या पगारातून मास्क खरेदी केले. हे मास्क सरकारी दवाखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्याचा निर्णय घेतला. आज सणसर (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना हे मास्क सोलापूरचे पालकमंत्री व राज्याचे वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचया हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी भरणे यांनी या उपक्रमाची माहिती घेतल्यानंतर मिनाक्षी निंबाळकर यांचे कौतुक केले.
(दत्तात्रेय भरणे यांनी मिनाक्षी निंबाळकर यांच्या कामाचे केले कौतुक- व्हिडीओ पहा –
दत्तात्रेय भरणे, पालकमंत्री सोलापूर – आरोग्य विभागातीलच एक महिला कर्मचारी स्वतः मधुमेहाने ग्रस्त असूनही आपल्या सहकाऱ्यांसाठी संपूर्ण पगार देते. त्यातही पगारातून आपल्या सहकाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न हातात घेते ही या पुरोगामी महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. जनतेपासून प्रशासनापर्यंत सर्वजण सरकारच्या पाठीशी भक्कम असल्यानेच या गंभीर संकटातही सरकार खंबीरपणे उपाययोजना करीत आहे.










