राजेंद्र झेंडे,दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड – जिल्ह्यात ग्रामीण भागातील वंचीत घटक व गरजू नागरीकांना जीवनाश्यक साहित्य, आरोग्य सेवा व इतर सोयीसुविधांसह योजना पोचविण्यासाठी योग्य नियोजन केल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिली.
कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर श्री. प्रसाद यांनी शनिवारी ( ता.९ ) दौंड तालुक्यात भेट दिली. यावेळी प्रसाद यांनी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तालुक्यातील शरद भोजन योजनेअंतर्गत 4 टप्पा, दिव्यांग व्यक्ती, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शिधापत्रिका नसलेल्यांसाठी 1 किलो खाद्यतेल व धान्यवाटपाची सुरवात त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तालुक्यातील १० हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान पाटस येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावरून पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याची पाहणी प्रसाद यांनी केली. प्रवाशांना भोजनाची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी समितीचे कौतुक केले. या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्या सारीखा पानसरे, दौंड पंचायत समितीच्या सभापती आशा शितोळे, उपसभापती नितीन दोरगे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॅा.अशोक रासगे, वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॅा.टी.आर.बनसोडे, सरपंच संभाजी खडके, ग्रामविकास अधिकारी चव्हाण, आरोग्य सेवक डॅा.बडे, नितीन शितोळे, सुधीर पानसरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसाद म्हणाले,` बाहेरील जिल्हा व राज्यातील प्रवाशांच्या वाहतुकीसाठी शासन लवकरच निर्णय घेईल. मात्र प्रवास करताना त्यांना ठिकठिकाणी अडचणी येत आहेत. अशांची जिल्हयात कुठेही गैरसोय होणार नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिथे शक्य असेल तिथे नागरीकांनाही मदतीसाठी पुढे यावे. आरोग्य सेवेत कमतरता राहू नये यासाठी आरोग्य विभाग योग्य ती दक्षता घेत आहे.`











