बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील कटफळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तब्बल ५२ जणांचे घशातील द्रवाचे नमुने आरोग्य खात्याने घेतले होते. त्यापैकी ४४ जणांचा सुरवातीस अहवाल आला, दुपारी उर्वरित ८ जणांचेही अहवाल आले, सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने कटफळसह तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
बारामती करोनामुक्त केल्याचा आनंद बारामतीकरांच्या मनात असतानाच पित्ताशयाच्या कर्करोगाचा सामना करणाऱ्या कटफळ येथील रुग्णास कोरोना झाल्याची बातमी धडकल्याने बारामती तालुक्यातीलच नागरिकांच्या छातीत धस्स झाले होते. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने तातडीने या रुग्णाच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टचे सर्वेक्षण करून तब्बल ५२ जणांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. आज त्यांचा दोन टप्प्यात अहवाल आला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याची माहिती दिली.










