इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामुळे इंदापूरला दुहेरी आमदाराचा लाभ मिळेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इंदापूरात येऊन हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला होता. तो या निमित्ताने भाजप पाळणार अशीही चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीच्या निमित्ताने राज्यपालांनी केलेल्या शिफारसीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरीषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक जाहीर केली आहे. आयोगाच्या निर्णयामुळे मध्यंतरी निर्माण झालेला राज्यातील पेच सुटण्यास जशी मदत झाली, तशीच आता इंदापूरात व एकूणच विधानसभा निवडणूकीनंतर पुणे जिल्ह्यात भाजपला आलेली मरगळ दूर होण्यासही मदत होणार आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा इंदापूरसाठी दुग्धशर्करा योग ठरावा अशीच भाजप समर्थकांची इच्छा आहे. विधानसभा निवडणूकीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाजपची साथ धरली होती. विधानसभा निवडणूकीत त्यांना उमेदवारीही मिळाली. मात्र सध्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्यांना दुसऱ्यांदा पराभूत केले. त्यानंतर इंदापूरात आलेल्या भाजपच्या नेत्यांनी आम्ही हर्षवर्धन पाटील यांना वाऱ्यावर सोडणार नाही, योग्य वेळी त्यांचे राजकीय पुनर्वसन करू असा शब्द दिला होता. आता राज्यात नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीत भाजप पंकजा मुंडे, राम शिंदे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचा विचार करतानाच कॉंग्रेसमधून आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचाही विचार करणार का? याची चर्चा इंदापूरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
नानासाहेब शेंडे, तालुकाध्यक्ष भाजपा इंदापूर- पक्षनेतृत्वाने इंदापूर तालुक्याला प्रतिनिधीत्व द्यावे. विधानसभेत काट्याची लढत होऊन निसटता पराभव झाला. भाजपने येथे जवळपास तोलामोलाची मते मिळवली असून पुणे जिल्ह्याच्या पू्र्व भागात भाजप मजबूत करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत.










