बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती – भाजपचे सरकार उलथवून आलेल्या महाविकास आघाडीकडून जनतेच्या अपेक्षा किती वाढल्यात आणि त्यातही वेगवान कार्यक्षमतेच्या नेत्याकडून किती वाढल्यात याची प्रचिती आज बारामतीकरांना आली..उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेली प्रचंड गर्दी, अपुरे पडलेले रस्ते हे चित्र आज बारामतीने पाहिले.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंतचा वेळ कार्यकर्ते व अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवला होता. मात्र लोकांची गर्दी प्रचंड झाल्याने अजितदादांनी सकाळी सात वाजताच लोकांना भेटून अर्ज स्विकारण्यास सुरवात केली. अजित पवार यांचे सहयोग निवासस्थान सोडून बाहेरच्या गेटपर्यंत लोकांची गर्दी होती. याची माहिती मिळाल्यानंतर अजित पवार यांनी एका-एकास भेटण्यापेक्षा जे अर्ज बारामती व आसपासचे आहेत, अशा अर्जदारांची कामे लागलीच जाग्यावर मार्गी लावण्यासाठी सर्व अधिकारी बोलावले. सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना समोर बसवूनच अजित पवार यांनी आलेले अर्ज लागलीच त्यांच्याकडे दिले. या अर्जाची नोंद करून घेतली व अर्जानुसार कोणकोणती कामे तातडीने मार्गी लागू शकतात याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर ज्या कामासाठी वेळ किंवा पुढील वरिष्ठ स्तरीय परवानग्या आवश्यक आहेत, त्याही मार्गी लावल्या, या दरम्यान अजित पवार यांनी तीन वेळा बाहेर येऊन लोकांकडून अर्ज स्विकारले. या सर्व अर्जांची छाननी लागलीच करून जी कामे त्वरीत होणे शक्य आहे, ती लागलीच मार्गी लावली व ज्या अर्जांमध्ये त्रुटी किंवा सुनावण्या होणे अपेक्षित आहे, त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देऊन याचा अहवाल देण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले.
दादा आज महिला दिन आहे…
अजित पवार यांना भेटण्यासाठी व निवेदन देण्यासाठी महिला व युवती मोठ्या संख्येने आल्या होत्या. मात्र आतमध्ये अधिकारी अर्जांची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी बसलेले आहेत, त्यामुळे आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, लाभार्थ्यांना बाहेर थांबविण्यात आले होते. मात्र यामधून एका महिलेने आवाज देत दादांना निरोप द्या, आज महिला दिन आहे एवढेच वाक्य उच्चारले. अर्थात त्याअगोदरच अजितदादांनी महिला असतील तर त्यांना आधी आतमध्ये पाठवा असा सकाळीच निरोप दरवाजानजिक थांबलेल्या कार्यकर्त्यांना दिला होता. काही महिलांशी भेटून त्यांचे म्हणणेही दादांनी ऐकले होते. मात्र त्यानंतर मोठ्या संख्येने आलेल्या दरवाजापाशी थांबून आहेत, म्हटल्यावर अजितदादांनी त्या महिलांना आतमध्ये पाठविण्याची सूचना केली व त्यानुसार अगदी दोन मिनीटातच दादांपर्यंत पोचून महिलांनी आपली निवेदने, तक्रारी सांगितल्या व त्यानंतर अगदी विजयी थाटात सर्व महिला सहयोग निवासस्थानातून बाहेर पडल्या.










