महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
बारामतीत वाहन तपासणी सुरू असताना होमगार्डच्या पायावरून गाडीचे चाक गेले, म्हणून गाडी थांबवली, तर वाहनचालकाने पोलिसाचीच कॉलर धरली व शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली..मग काय, पोलिसांमधील सिंघम जागा झाला..आणि भर रस्त्यात पोलिसांनी वाहनचालकाची धुलाई केली..!
भर रस्त्यावर आज दुपारी झालेल्या प्रकाराची दिवसभर बारामतीत चर्चा सुरू आहे. हा वाहनचालक राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. हा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पती असल्याचे सांगितले जात आहे. कदाचित त्यामुळेच नंतर हा प्रकार मिटवण्याचा बराच काळ घोळ सुरू होता. मात्र पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून शिवीगाळ करण्याच्या प्रकाराने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.
बारामतीच्या पेन्सिल चौकात पोलीस अधिकारी, महिला कर्मचारी, होमगार्ड हे बेशिस्त वाहनांवर कारवाई करत होते, तेव्हा चारचाकी वाहनातून आलेला हा पदाधिकारी होमगार्डच्या शेजारून वाहन घेऊन पुढे गेला. त्यात चार चाकी वाहनाचा धक्का होमगार्ड कर्मचाऱ्याच्या पायाला लागल्याने पोलिसांनी त्या पदाधिकाऱ्याला गाडी थांबविण्यासाठी विनंती केली. मात्र, त्याने गाडी थांबवली नाही, मग पोलिसांनी पळत जाऊन गाडी थांबवली व पदाधिकाऱ्यास गाडीबाहेर येण्यास सांगितले, तो येत नसल्याचे पाहून पोलिसांनी गाडीची चावी काढून घेतली. गाडीची चावी घेतल्याचा राग आल्याने या पदाधिकाऱ्याने पोलिसाची कॉलर धरून शिवीगाळ केली. मग मात्र पोलिसांनी या वाहनचालकाची धुलाई केली.











