इंदापूर: तालुक्यातील अनेक शिधापत्रिका धारकांना तहसील कार्यालयाकडून उत्पन्नाच्या कारणावरून नोटिसा बजावण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तुमचे उत्पन्न अधिक असल्याने आतापर्यंत घेतलेल्या रेशनचे पैसे भरा, अन्यथा रेशनकार्ड शुभ्र (पांढऱ्या) दर्जेचे करा, अशा आशयाच्या या नोटिसा प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित नोटिसांवरील पुढील कारवाई तातडीने थांबवून प्रत्येक प्रकरणाची प्रत्यक्ष पडताळणी आणि सुनावणी घ्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात शिवसेना (उबाठा) इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक सुधीर जायभाय यांना निवेदन सादर केले. रेशनच्या माध्यमातून मिळणारे धान्य हे गरीब, अल्पभूधारक, शेतमजूर, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी जगण्याचा मोठा आधार आहे. केवळ संगणकीय नोंदींमधील त्रुटी, आधार किंवा ई-केवायसीमधील अडचणी, दुबार नोंद किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे पात्र लाभार्थ्यांचे रेशन अचानक बंद करणे अत्यंत अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका रणवरे यांनी मांडली.
कोणत्याही कुटुंबाला अपात्र ठरवण्यापूर्वी त्यांच्या कागदपत्रांची सखोल तपासणी करावी आणि त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच या नोटिसांमागील नेमके शासन आदेश, नियम आणि निकष प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट करावेत आणि अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही पात्र कुटुंबाचे रेशनकार्ड अथवा धान्याचा लाभ बंद करू नये, असेही नमूद केले आहे.
रेशनकार्डमधील त्रुटी दुरुस्त करणे, कागदपत्रे सादर करणे तसेच मृतांची नावे वगळणे यांसारख्या कामांसाठी प्रशासनाने तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल. केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणांमुळे कोणताही गरजू नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख सचिन इंगळे, शहरप्रमुख अविनाश खंडाळे, शहर संघटक देवा मगर, दत्ता खुडे, उपशहरप्रमुख युवराज लोंढे, विष्णू चोरमले, स्वप्नील उतेकर, विजयसिंह चोरमले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.










