बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात १९ वर्षीय अविष्कार अमोल ढोले याच्या डोक्यात गोळी लागून झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गावाकडच्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या तणावामुळे त्याने स्वतःवर गोळी झाडल्याचे सांगितले जात असले, तरी अविष्कारने आत्महत्या केली की, त्याच्या मृत्यूमागे एखादा घातपाताचा प्रकार आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अविष्कार ढोले (वय १९, रा. कुरवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) हा बारामती शहरातील सूर्यनगरी येथील जयश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता. डोक्यात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद बारामती तालुका पोलीस ठाण्यात मयत रजिस्टर क्रमांक ८५/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.
पिस्तूल आले कुठून? हा सर्वात मोठा सवाल!
या संपूर्ण प्रकरणाचा तालुका पोलीस कसून तपास करत आहेत, मात्र सध्या बारामतीतील नागरिकांच्या चर्चेतून सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे अविष्कारच्या हातात पिस्तूल आले कसे आणि कोठून? त्याने हे पिस्तूल कोठून मिळवले? पिस्तूल कोणाच्या मालकीचे होते? तसेच गोळी झाडण्यापूर्वी आणि त्यानंतर घटनास्थळी नेमके काय घडले, याचा तपास होणे महत्त्वाचे आहे. एखाद्या वाहन चालकाकडे पिस्तूल आहे किंवा पिस्तूल येते, म्हणजेच येणाऱ्या काळात किती धोकादायक परिस्थिती आहे? यावरून देखील चिंता व्यक्त केली जात आहे.
अविष्कारच्या प्रेमसंबंधांबाबतही परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. त्याचे मूळ गावातील एका महिलेसोबत संबंध होते की, स्थानिक एखाद्या महिलेसोबत? याबाबतही वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अविष्कारवर गोळी झाडल्याची चर्चाही बारामतीत जोरदार सुरू आहे. घटनेला काही दिवस उलटले आहेत, त्यामुळे पिस्तूल नेमके कोठून आले? गोळीबाराची परिस्थिती काय होती आणि या घटनेमागील नेमके कारण काय? याबाबत सूर्यनगरी परिसरात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
गोळी अविष्कारने स्वतःच झाडून घेतली की दुसऱ्या व्यक्तीने? पिस्तूल कुणाचे होते? घटनास्थळी नेमके काय घडले? या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणे अपेक्षित आहे. अविष्कारच्या मृत्यूमागचे नेमके गूढ काय आहे, याचा उलगडा कधी होणार? याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.










