विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार आक्रमक; विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असताना पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेते सहभागी झाले होते. यावेळी रोहित पवार यांनी MPSCच्या अध्यक्षपदाबाबत सरकारला थेट सल्ला देत हे पद तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्याची मागणी केली.
आमदार रोहित पवार यांनी विवेक भीमनवार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. “MPSC आयोगाचे अध्यक्षच वादग्रस्त आहेत. त्यांच्या आधीच्या विभागातील कामकाजाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भीमनवार यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली असून, त्यांच्या नियुक्तीला अनेकांनी विरोध केला होता,” असा दावा त्यांनी केला.
भीमनवार RTOमध्ये कार्यरत असताना त्या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना देण्यात आले आहेत. RTOमधील रॅकेट अजूनही सुरू असल्याचा आमचा आरोप आहे. आम्ही आतापर्यंत केवळ ४० टक्के पुरावेच समोर आणले आहेत. उर्वरित पुरावेही समोर आणू, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, MPSC अध्यक्षपदासाठी तुकाराम मुंढे यांचे नाव पुढे करत रोहित पवार यांनी सरकारसमोर पर्यायही सूचवला. MPSC अध्यक्षपद तुकाराम मुंढे यांच्याकडेच द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार आणि आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत पुढील भूमिका काय घेणार, याकडे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.











