बोगस गोरक्षकांवर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अहिल्यानगर, महान्यूज लाईव्ह
गोवंश बंदी कायद्याचा गैरफायदा घेत राज्यभरात बोगस गोरक्षकांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचा आरोप करत शेतकरी व व्यापाऱ्यांना होणारी मारहाण आणि लूटमार तातडीने थांबवावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत आणि राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत अशा प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुणवडी येथील शेतकरी विजय भाऊसाहेब शेळके यांना १५ ते २० जणांनी मारहाण केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यांच्या ताब्यातील गाय व वासरू तसेच २१ हजार रुपयांची रोकड घेऊन गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच शेतकऱ्याचे पैसे आणि गाय-वासरू परत मिळवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतीकाम, दुग्ध व्यवसाय किंवा बाजारातील खरेदी-विक्रीसाठी गायी, म्हशी व बैलांची वाहतूक करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना रस्त्यात अडवून त्रास दिला जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. पोलिसांकडून पुरेशी शहानिशा न करता वाहने व जनावरे जप्त करून गोशाळांमध्ये पाठवली जातात. काही गोशाळांमध्ये योग्य निवारा आणि चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होऊन मृत्यू होत असल्याचे, तसेच काही ठिकाणी जनावरांची परस्पर विक्री केली जात असल्याचे आरोप निवेदनातून करण्यात आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने त्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतुकीदरम्यान पोलीस संरक्षण देता येत नसेल, तर गोवंश बंदी कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा. भविष्यात अशा प्रकारे लूटमार झाल्यास रयत क्रांती संघटना आणि शेतकरी स्वसंरक्षणासाठी तीव्र प्रतिकार करतील. या काळात काही अप्रिय घटना घडल्यास त्यासाठी शेतकरी किंवा व्यापाऱ्यांना जबाबदार धरू नये, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या निवेदनाच्या प्रती अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, श्रीगोंदाचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडेही पाठवण्यात आल्या असून, संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.











