राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खामगाव येथे बिबट सदृश्य वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी तेजस रमेश म्हेत्रे यांच्या तबेल्यातील तब्बल १७ बोकड जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
खामगाव येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने तेजस म्हेत्रे यांच्या तबेल्यावर हल्ला केला. एका पाठोपाठ एक १७ बोकडांवर हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले. सकाळी ही घटना लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला कळवले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक ज्ञानदेव भोंडवे, वनरक्षक गणेश म्हस्के तसेच यवतच्या वनपाल यवत श्रीमती भाग्यश्री टोणपे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत पशुधनाची पाहणी करून नियमानुसार पंचनामा करण्यात आला.
यावेळी शुभम राजेंद्र सणस, संकेत म्हेत्रे, अभिजित लोखंडे, सुनील विधाटे, शेहनशा दिलावर शेख, समीर दस्तगीर शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान
या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले की, “शासनाच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई देण्यात येईल.”
दरम्यान खामगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वाड्या वस्त्यांवरील शेतकरी, नागरिक व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, पशुधन सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी बांधावे, रात्री एकट्याने बाहेर पडणे टाळावे, मानव- बिबट संघर्ष होऊ नये म्हणून वनविभागामार्फत गावात जनजागृतीही करण्यात आली आहे.










