बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहर आणि तालुका परिसरातून महागड्या बुलेट व इतर दुचाकींची चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व बारामती तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले आहे. समाधान बाळू काळे (वय २३ वर्षे, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या १३ बुलेटसह एकूण १९ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे तब्बल १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लावायचा ‘लोगो’
गेल्या पंधरा दिवसांपासून बारामती परिसर व तालुक्यात बुलेट चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आरोपी समाधान काळे हा रात्रीच्या वेळी एकटाच फिरून विशेषतः ‘व्ही.आय.पी. नंबर प्लेट’ असलेल्या बुलेट व महागड्या दुचाकी चोरायचा. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आणि संशय येऊ नये म्हणून तो चोरीच्या गाड्यांवर ‘महाराष्ट्र पोलीस’, ‘महाराष्ट्र वनसेवा’ आणि ‘एसटी महामंडळ’ असे बनावट लोगो लावून फिरत असल्याची धक्कादायक कबुली त्याने चौकशीदरम्यान दिली आहे.
सापळा रचून आवळल्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पथक बारामती शहर परिसरात गस्तीवर असताना, एक संशयित इसम चोरीची दुचाकी घेऊन मेडिकल कॉलेज परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पेन्सिल चौक ते मेडिकल कॉलेज रस्त्यावर सापळा रचून पाठलाग करत समाधान काळे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पो.स.ई. बाळासाहेब कारंडे आणि पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, अभिजीत एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आठोले व विठ्ठल तरंगे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.










