जळगाव, दि. २७ : जळगाव जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ४३१ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली असून, दररोज सरासरी दोन ते तीन आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. व्यसनाधीनता, नैराश्य, कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा, आजारपण, मानसिक ताण, प्रेमभंग, परीक्षेचा ताण यांसारख्या विविध कारणांमुळे अनेकांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

या आकडेवारीतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण जवळपास दहा पटींनी अधिक आहे. एकूण ४३१ आत्महत्यांपैकी ३८३ पुरुष, २९ महिला, ८ अल्पवयीन मुले आणि ११ अल्पवयीन मुली यांचा समावेश आहे. त्यामुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्याबाबत आणि सामाजिक अपेक्षांच्या ओझ्याबाबत गंभीर चर्चा होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी केलेल्या कारणांच्या विश्लेषणानुसार, दारूचे व्यसन हे आत्महत्येचे सर्वात मोठे कारण ठरले असून, ९० पुरुषांनी या कारणामुळे जीवन संपवले. त्यानंतर नैराश्यामुळे ७४, कौटुंबिक वादांमुळे ६४, कर्जबाजारीपणामुळे ५२, लग्न न जुळल्याने २९, प्रेमभंगामुळे ७, मानसिक ताणतणावामुळे ६ आणि परीक्षेच्या तणावामुळे ६ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
विशेष म्हणजे, लग्न न जुळणे या कारणामुळे २९ तरुणांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्याने हा केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक चिंतेचा विषय बनला आहे. विवाहाबाबतचा सामाजिक दबाव, अपेक्षा आणि मानसिक तणाव याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव, व्यसनमुक्तीबाबत प्रभावी उपाययोजनांची कमतरता, वाढता आर्थिक ताण आणि कौटुंबिक तणाव यामुळे आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सामाजिक संस्था, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने समन्वयाने मानसिक आरोग्य समुपदेशन, व्यसनमुक्ती अभियान आणि संकटग्रस्त व्यक्तींना वेळेवर मदत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. जळगाव जिल्ह्यातील ही वाढती आत्महत्यांची मालिका समाजासाठी गंभीर इशारा मानली जात असून, केवळ आकडेवारी न पाहता त्यामागील कारणांवर प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे.











