राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथील समर्थ लॅबोरेटरीमध्ये नकली आणि विषारी दारू बनवली जात असल्याचे उघडकीस आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने नकली दारू बनवणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. यासोबत 3,420 किलो प्रतिबंधित क्लोरल हायड्रेट आणि ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 5,800 लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथील समर्थ लॅब या कंपनीत २९ जून रोजी पुणे ग्रामीण पोलीस यांच्यासह दौंड पोलीसांनी रात्री धाड टाकली होती. तब्बल सहा तास या कंपनीत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री पोलिसांनी ही कंपनी सीलबंदही केली होती. मात्र काय कारवाई केली आहे हे मात्र गुलदस्त्यात ठेवले होते.
मात्र याप्रकरणाचा मोठा भांडाफोड आता पोलीसांनी केला आहे. या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. किशोर दत्तात्रय सुर्वे (वय ५२ ), शैलेश विठ्ठल ठाकूर (वय ५५), नवी सरवर जमीर सिद्दिकी रथ (वय ४०), आदेश विठ्ठल पाचांगणे वय (५८) अशी या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या कोल्हापूर युनिटला माहिती मिळाली होती की, कुरकुंभ येथील समर्थ लॅबोरेटरीजमध्ये एमडी ड्रग्स तयार केले जात आहे. या टीमने सुमारे दीड महिना कारखान्यावर पाळत ठेवली आणि 29 जून रोजी छापा टाकला. यावेळी कारखान्यातून 3,420 किलो पिवळ्या रंगाचे क्रिस्टलसारखे संशयित पदार्थ आणि ते बनवण्यासाठी वापरण्यात येणारे 5,800 लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले.
जप्त केलेल्या नमुन्यांची तपासणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये करण्यात आली. अहवालात स्पष्ट झाले की हा पदार्थ प्रतिबंधित क्लोरल हायड्रेट आहे, ज्याचा वापर नकली दारू बनवण्यासाठी केला जातो. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जप्त केलेल्या क्लोरल हायड्रेटमधून सुमारे 15 लाख लिटर नकली दारू तयार करता आली असती.
तपासात असेही समोर आले आहे की समर्थ लॅबोरेटरीज ही अटकेत असलेला आरोपी किशोर सुर्वे याचीच आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार किशोर सुर्वे याच्यावर यापूर्वीही NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. यापूर्वीही त्याने अशाच प्रकारे नकली दारू तयार करून बाजारात पुरवठा केला असावा असा पोलिसांना संशय आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी कारखान्यातून सेंट्रीफ्युगल मशीन आणि GLR मशीन देखील जप्त केली आहेत. त्यांची अंदाजे किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. पुणे ग्रामीण पोलीस या नेटवर्कच्या इतर कड्या जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.










