ज्ञानेश्वर रायते, बारामती
बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना अचानक डोळ्यापुढे अंधारी येणे, घशाला कोरड पडणे, घसा दुखण्यासारखी लक्षणे सुरू झाली. लक्षणे एवढी वाढली की, दवाखान्यात दाखल करून उपचार घ्यावे लागले.. त्यानंतर कटफळ भागातही असाच प्रकार घडला.. इंदापूर तालुक्यातील लाकडीतील सरकारी कामावर असलेल्या मजूरांनाही अचानक हा त्रास सुरू झाला.. काही स्थानिक रहिवाशांनाही हाच त्रास सुरू झाला. आतापर्यंत अधिकृत माहितीनुसार बारामतीत 25 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली आहे.
आरोग्य तज्ञांच्या मते धोत्र्याच्या बियापासून ज्या पद्धतीची विषबाधा होऊ शकते, तशी लक्षणे या लोकांमध्ये आढळली आहेत. अर्थात याप्रकरणी अन्नभेसळ प्रतिबंधक विभागासह आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील तातडीने त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली. यामधील संबंधित ठिकाणचे अन्नाचे नमुने कच्चे साहित्य जप्त करण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
अर्थात येथे सुरू असलेल्या चर्चेनुसार व आरोग्य विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाकडी, कटफळ किंवा बारामती वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विषबाधेच्या प्रकरणात अन्नातील इतर साहित्य वेगवेगळ्या असले, तरी या सर्वांच्या भोजनासाठी खरेदी करण्यात आलेला गव्हाचा आटा मात्र एकाच कंपनीचा असल्याने यावर संशय व्यक्त केला जात आहे.
अर्थात अन्न व दुसरा प्रतिबंधक खात्याने व काही खाजगी व्यक्तींनी देखील या आट्याचे नमुने तपासण्यासाठी घेतले आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून अन्न बनवले आहे, मात्र विषबाधा झालेल्या बहुतांश जणांनी एकाच कंपनीचा आटा खाल्लेला आहे हे यातील साम्य असल्याने या आट्याविषयी शंका निर्माण झाली आहे.
आत्तापर्यंत बारामतीत ज्यांनी ज्यांनी एका विशिष्ट कंपनीचा आटा खाल्ला, त्यांना ही लक्षणे आढळून आली आहेत.. मग सगळीकडे धावपळ सुरू झाली. शासकीय यंत्रणेने सगळीकडे छापेमारी केली, एक हॉटेल तर विनाकारण बंद करून टाकले, एक अधिकारी महिला या हॉटेल मालकाला अत्यंत विचित्र पद्धतीने वागणूक घेत होती, ज्याबद्दल अगदी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील आक्षेप घेतला. अर्थात एवढी छापीमारी झाली असली, तरी जिथून या आट्याची उत्पत्ती होते, त्या संगमाच्या ठिकाणाला मात्र काहीच बाधा झाली नाही. आत्ताच त्या ठिकाणी संशय घेता येणार नाही अशा स्वरूपाचे तात्पुरते प्रशस्तीपत्र संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते.
दरम्यान बारामतीत या प्रकाराची अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. आट्याचे नमुने अन्न व भेसळ प्रतिबंधक खात्याने ताब्यात घेऊन त्याचे पंचनामे करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले असल्याची माहिती दिली जात आहे, मात्र संबंधित आटा अजूनही बाजारात मिळतो आहे. अगदी काल रात्रीपर्यंत या आट्याची बिनधास्त विक्री सुरू होती. दरम्यान या आट्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांना किंवा आट्यापासून रोट्या बनविणाऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच दणका दिला, मात्र आटा उत्पादनावर मात्र टाच आली नसल्याने त्याची बारामतीत चर्चा सुरू आहे. एका शासकीय अधिकाऱ्याचे लागेबांधे असल्याचा फायदा या उत्पादकाला मिळाला असल्याची कुजबुज सुरु आहे.











