पालघर : महान्यूज लाईव्ह
अलीकडच्या पोरांना काय झाले काय माहित पण दुचाकीच्या धक्क्याने सुद्धा माणसाचा जीव जाऊ शकतो.. धक्का सहज लागतो पण ईगो मात्र मोठा हर्ट होतो.. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागातील ही घटना. दुचाकीचा धक्का लागला म्हणून वादावादी सुरू झाली आणि त्यात लोखंडी सळई डोक्यात घालून युवकाचा खून करण्यात आला.
या घटनेमध्ये सौरभ मिश्रा याचा खून झाला. 26 वर्षीय सौरभ हा नालासोपारा शेरा सर्कल भागात राहत होता. त्याचा मित्र विवेक गुप्ता याचा सोमवारी वाढदिवस असल्याने केक कापून सेलिब्रेशन करायचे होते, म्हणून सचिन शर्मा, विवेक गुप्ता, सोनू खान आणि सौरभ मिश्रा हे सर्व जण नालासोपारा येथील संतोष भवन परिसरात राहत असलेल्या मित्राला दुचाकीवरून घेण्यासाठी निघाले होते.
मुचीपाडा परिसरात राहत असलेल्या अजय चव्हाण आणि कौशिक चव्हाण यांना सौरभ मित्राच्या दुचाकीचा धक्का लागला. त्यावरून वादावादी सुरू झाली. या वादावादीत दोघांनी सौरभला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर चव्हाण याचे आई-वडील, मित्र सुनील सोनवणे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील मारायला सुरुवात केली.
सौरभ सोबत असलेल्या मित्रांनी ही वादावादी आणि मारहाण मध्यस्थी करून थांबवली. मात्र तिथून जात असताना कौशिक चव्हाण हा त्याच्या घरातून लोखंडी सळई घेऊन आला आणि त्याने सौरभच्या डोक्यात सळईने वार केला. यात सौरभ गंभीररीत्या जखमी झाला आणि त्याला दवाखान्यात नेले असतानाच आयकॉन रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.











