जेजुरी : महान्यूज लाईव्ह
बऱ्याचदा सामायिक शेती, भावकीची शेती, कोरलेले बांध, आणि सामायिक विहिरी यावरून शेतकऱ्यांची भांडणे होतात. आज महाराष्ट्रात महसुली धोरणाशी संबंधित जेवढे वाद आहेत, त्यातील बहुसंख्य वाद या वादाशी निगडित आहेत. पुरंदर तालुक्यात आंबळे गावात जगताप वस्ती येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आंबळे गावातील जगताप वस्तीवर विहिरीच्या पाण्याचा दिवस ठरवण्यावरून सुरू झालेला वाद एवढ्या टोकाला पोहोचला की एका शेतकऱ्याचा धारदार चाकूने खून झाला. हा खून भावकीच्या भांडणातूनच झाला. या घटनेत अविनाश मल्हारी जगताप यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा खून केल्याप्रकरणी बाळूदास काळूराम जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे.
आंबळे गावातील जगताप वस्तीवर अविनाश जगताप आणि बाळूदास जगताप यांची सामायिक शेती आहे. या शेतीला पाणी देण्यासाठी सामायिक विहीर आहे. या विहिरीचे पाणी कोणत्या दिवशी घ्यायचे यावरून सुरू झालेली बाचाबाची भांडणापर्यंत पोचली आणि भांडण एवढ्या टोकाला गेले की, बाळूदास जगताप याने खिशातील चाकू काढून अविनाश जगताप यांच्यावर वार केले. या घटनेत अविनाश जगताप यांचे वडील मल्हारी जगताप आणि गणेश जगताप या दोघांवरही चाकूने वार करण्यात आले.
या घटनेत गंभीर जखमी झाल्याने अविनाश जगताप यांचा मृत्यू झाला. त्याची फिर्याद सौरभ दत्तात्रय जगताप यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत सहाय्यक निरीक्षक दीपक वाकचौरे, फौजदार सर्जेराव पुजारी, हवालदार दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम, महेश पाटील, यांनी तातडीने घटनास्थळी पोहचले व पळून जात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास जेजुरी पोलीस करत आहेत.











