वाराणसी : महान्यूज लाईव्ह
घटना अर्थातच विचित्र घडणाऱ्या उत्तर प्रदेश मधीलच.. वाराणसी शहरात आणि एकूणच उत्तर प्रदेशला हादरा देणारी ही घटना. एकाच दिवशी वाराणसीतल्या एकाच कुटुंबातल्या पाच जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना घडली होती पाच नोव्हेंबर 2024 रोजी… मात्र पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा मात्र सगळीकडे खळबळ उडाली.. आपल्या आई-वडिलांच्या हत्येचा एका आयटी इंजिनियरने 34 वर्षानंतर नियोजनपूर्वक बदला घेतला होता.
5 नोव्हेंबर 2024 रोजी राजेंद्र गुप्ता यांचा मृतदेह आढळला. याच दिवशी त्यांची पत्नी आणि तीन मुलांचाही गोळ्या झाडून खून केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि जी धक्कादायक माहिती समोर आली त्याने पोलीस देखील चक्रावून गेले. पुतण्याने चुलत भावांसह चुलता व चुलतीचा केलेला हा खून आपल्या आई-वडिलांच्या हत्येचा सूड होता.
या घटनेची सुरुवात 34 वर्षांपूर्वी झाली होती. 5 नोव्हेंबर 2024 रोजी त्याचा खून झाला त्या राजेंद्र गुप्ता याने त्याच्या लहान भावाची भावजयीची व वडिलांची गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येवेळी लहान भावाचा मुलगा विशाल हे सगळे पाहत होता. या हत्येनंतर भावाचीच तीन मुले पोरकी झाली. ही मुले राजेंद्र गुप्ता याने स्वतःच्या घरात वाढवली मात्र सातत्याने आपल्या लहान भावाची मुले असल्याने त्यांच्यावर अन्याय होत राहिला. यामध्ये पुतण्या असलेला विशाल गुप्ता हा मनात सूड धरून राहिला होता.
आपल्या आई-वडिलांची हत्या ज्यांनी केली त्या आपल्या चुलत्याला आणि त्याच्या कुटुंबाला संपवायचे असा संकल्प तो लहानपणापासूनच धरून होता. मात्र त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि आयटी कंपनीत नोकरी करू लागला. परंतु घडलेली 34 वर्षांपूर्वीची घटना त्याच्या मनातून जात नव्हती. त्यासाठी त्याने 5 नोव्हेंबर 2024 हा दिवस ठरवला. ज्या घरात आपल्या आई-वडिलांची हत्या झाली होती. त्याच घरात त्याने काका, काकू आणि तीन चुलत भावंडांना गोळ्या घालून ठार मारले.
पोलिसांनी या घटनेचा तपास केला आणि विशाल गुप्ता याला अटक केली. मात्र त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा कोणताही लवलेश नव्हता. माझ्या आई-वडिलांच्या खुनाचा आपण बदला घेतला असे तो स्पष्टपणे सांगत होता आणि मी आता निवांत झालो आहे असे तो पोलिसांना सांगत होता.











