विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. ठेकेदार रस्त्याचे काम करीत आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था? असा प्रश्न वाहतुकदारांना पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यासाठी सुमारे नऊ हजार कोटींचा निधी आणला आहे. ठेकेदार जगवण्यासाठी कोणताच आमदार निधी आणत नाही तर नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते, मूलभूत सुविधा मिळण्यासाठी हा निधी येत असतो.
त्याच झालं अस बाबुर्डी गावातील बाबूर्डी ते सुपे लोणी भापकर ते दादा राघू लव्हे घर रस्ता या रस्त्याच्या कामाची किंमत आहे अंदाजे १५ लाख! हा खडीकरणाचा रस्ता आहे. अवघ्या दीड महिन्यामध्ये या रस्त्याची खडी उखडलेली आहे. या रस्त्याची खडी उखडल्यामुळे वाहतूकदारांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यामुळे अपघाताची शक्यता ही नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर लक्ष देऊन रस्ता नीट करून घेतला असता तर रस्ता उखडलाच नसता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करतात तरी काय? असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे.
काही दिवसापूर्वी बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, एका भागात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे चाललं आहे. जळगाव ते अंजनगाव या रस्त्याचंही डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं असून दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. एक सांगतो, कामं तर दर्जेदार झालीच पाहिजेत. शेवटी कामं एकदाच होत असतात.
ब्रिटिशांच्या काळात झालेली कामे शंभर शंभर वर्षे टिकली आणि आपली कामे २५ वर्ष टीकत नाहीत. कशाला कामे कॉन्ट्रॅक्टर घेतात? त्यांना कोण मागे लागलय का? की, कामे घ्या? करायचं असेल तर चांगलं करा ना काम. नाहीतर अशांना काळ्या यादीतच टाकणार आहे. आता काम पुढाऱ्यांच आहे का कुणाचं हे बघणार नाही. मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. कामं दर्जेदार करून द्या. असा इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉन्ट्रॅक्टरांना दिला होता. त्यामुळे आता बाबुर्डीतील या रस्त्याचे ज्या ठेकेदाराने नित्कृष्ट दर्जाचे काम केले, त्या ठेकेदाराची चौकशी होणार का?हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.











