ज्ञानेश्वर रायते, महान्यूज लाईव्ह
खंडेराव, ऐकलत का? इंदापुरात पुन्हा एक बेकायदा दगडी खाण चर्चेत आलीय.. तिच्या गर्भात म्हणे स्फोट झाला अन् पुन्हा तसेच दोन असहाय्य मजूर गंभीर जखमी झाले…! पण दीड दिवस या कानाची त्या कानाला खबर नाही! गंमत बघा… किरकोळ चुका असल्या की सरकारी कार्यालय धापा टाकत त्या संबंधित माणसाच्या मागे फिरतात इकडे अख्या दगडाच्या खाणीच्या खाणी बेकायदेशीर रित्या उभारल्या जातात आणि त्यात जेव्हा काहीतरी घातक घटना घडते आणि ती लोकांमध्ये पसरते त्यानंतर सरकारला जाग येते..!
इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावाच्या नजीक एक दगडी खाण आहे. ती दगडी खाण उचित परवानगी घेऊन केलेली नाही असेही बोलले जाते. या खाणीत चक्क परवा दिवशी म्हणजे आता 48 तासापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे, त्या खाणीमध्ये जिलेटीनच्या काड्यांचा स्फोट झाला. या खाणीत दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यापैकी एक मजूर गंभीर जखमी झाल्याने त्याला पुण्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याला गंमत म्हणायची की संतापाची बाब; पण सरकारी व्यवस्थेला तर या कानाची त्या कानाला खबर नाही. एका जागरूक नागरिकाने या संदर्भात फक्त चार ओळीत माहिती टाकली आणि रात्री पोलिसांची धावपळ उडाली. मग ही खाण कुठे? नेमकं तिथं काय झालं? याची माहिती घेण्यास पोलीस पुढे सरसावले अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही असे सांगितले जाते.
अर्थातच प्राथमिक माहिती आमच्याकडे असली तरी अजून गुन्हा दाखल नसल्याने ही बातमी देखील कळते समजते अशा स्वरूपाची; मात्र इंदापूर तालुक्यात दगडाचीही किंमत नसलेले लोक, दगडावर एवढे प्रेम करू लागले आहेत की, दगडापुढे जिवंत माणूसही त्यांना फिका पडू लागला आहे. एका वर्षापूर्वीच इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील दगड खाणीमध्ये उभारण्यात आलेल्या विहिरीचा कठडा पडून चार मजूर दगावले होते. त्याची शाई अजून विरत नाही, तोच दगड खाणींचे अद्भुत नमुने समोर येऊ लागले आहेत.
काही दिवसांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील एका गावात वन खात्याच्या हद्दीतून बिनधास्तपणे चाललेली खडी क्रशरच्या कंपनीची वाहने एका पत्रकाराने वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली, तर वनखात्याच्या अधिकाऱ्याने त्याचा बाप काढला. वनखात्याच्या हद्दीतून बेकायदेशीर रित्या वाहनांची येजा सुरू असताना त्याला कोणीच काही म्हणायचे नाही असा शिरस्ता वनखात्याचाच अधिकारी घालून देत असेल, तर कुंपण शेतच नाही, तर कुंपण मातीसहित शेणही खात असल्याची ही स्पष्ट जाणीव इंदापूर तालुक्यातील नागरिकांना होऊ लागली आहे.











