बारामती : महान्यूज लाईव्ह
डॉक्टर हा परमेश्वर नसतो हे मान्य, पण रुग्णाचे मागच्या पाच मिनिटापूर्वीपर्यंतचा त्याच्या प्रकृतीतील बदलानुसारचा तर्क आणि त्यानुसार काय घडू शकते याचे भविष्य डॉक्टर तंतोतंत सांगू शकतात, म्हणून त्यांना देवदूत म्हणतात.. पण अलीकडे डॉक्टरांनाही काय झाले माहित नाही; सेकंड ओपिनियन घेतल्याशिवाय खरं काय ते समजतच नाही.
घटना इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील. मोलमजूरी करणारा मारुती काटे पोट दुखते म्हणून भवानीनगरच्या डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. भवानीनगर मध्ये नव्याने सुरू झालेल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये मारुती काटे उपचारासाठी गेला. श्री सोनोग्राफी सेंटरमध्ये त्याला तपासणी केल्यानंतर अपेंडिक्स असल्याचा सल्ला आणि अभिप्राय दिला.

मग घाबरून मारुती काटेने उपचार काय घ्यायचे असे विचारले, तर त्याला तातडीने चिंतामणी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून घेतले. त्याला सलाईन आणि इंजेक्शन देण्यात आले. दोन दिवस उपचारासाठी दाखल करून घेतल्यानंतर अकरा ते बारा हजार रुपयांचा बिलही त्याला भरावं लागलं, पण फरक काही पडेना. पोट दुखायचे थांबेना.
मग अपेंडिक्सचं ऑपरेशनच करावं लागेल असा सल्ला मिळाल्याने आता पैसे नाहीत काय करायचे म्हणून तो ओळखीच्या एका डॉक्टरांकडे गेला. त्या डॉक्टरांनी प्रयत्न करून बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात तेथील तज्ञांशी बोलून त्याची शस्त्रक्रिया मोफत करण्याची विनंती केली. मारुती काटेला उपचारासाठी दाखल करून घेतलं गेलं, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून तेथेही सोनोग्राफी केल्यानंतर तेथील डॉक्टरांना वेगळच दिसून आलं.

मारुती काटेला अपेंडिक्स नसून त्याला मुतखडा असल्याचे डॉक्टरांना सोनोग्राफी केल्यानंतर दिसून आले. मग डॉक्टरांनी त्याला औषधं दिली आणि त्याची शस्त्रक्रिया रद्द केली. पण मग नेमकं खरं कोण हा प्रश्न मारुती काटेला पडला. मग मारुती काटे बारामतीच्या आणखी एका सोनोग्राफी तज्ञांच्या दवाखान्यात गेला. तेथे सोनोग्राफी केल्यानंतर त्याला मुतखडा झाल्याचे निदान झाले.

आता मारुती काटे ला मुतखडाच झालाय हे निश्चित पण भवानीनगरच्या डॉक्टरांनी त्याला अपेंडिक्स झाला असल्याचे का सांगितले? जर शस्त्रक्रिया झाली असती तर? खर्च तर खर्च झालाच असता, पण मारुती काटे आयुष्याचा अधू देखील झाला असता. आता मारुती काटेचे हे प्रकरण राज्य मानवी आयोगाकडे व तेथून इंडियन मेडिकल असोसिएशन कडे पाठवले जाणार आहे. अशाप्रकारे चुकीचे निदान झाले, तर रुग्णांचे होणारे नुकसान भरून काढायचे कोणी? हा प्रश्नच आहे.











