बारामती : महान्यूज लाईव्ह
या घटनेने बारामतीच्या कायदा सुव्यवस्थेला धक्का पोहोचला आहे. वंजारवाडी येथील ही घटना बुधवारी संध्याकाळच्या वेळेस घडली. वंजारवाडी येथील संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाच्या पुलापासून काही अंतरावर चालण्याचा व्यायाम करत असलेल्या महिलेला लघुशंकेच्या निमित्ताने पिकात गेल्यानंतर लक्ष ठेवून असलेल्या तीन नराधमांनी लुटले व तिच्या असाह्यतेचा गैरफायदा घेत तिला अर्धनग्न केले व तिचे फोटो काढले.
ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली. ती प्रसारमाध्यमांना काल समजली. भिगवण रस्त्यावर राहणाऱ्या तीस वर्षे महिलेच्या बाबतीत हा अत्यंत घाणेरडा प्रकार घडला. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास वंजारवाडी चौकात जवळील उड्डाणपणाजवळ चालण्याचा व्यायाम करत असताना लघुशंकेच्या निमित्ताने ही महिला एका उसाच्या पिकात गेली होती.
त्या ठिकाणी तिच्यावर नजर ठेवून असलेल्या एकाने तिच्या पाठीमागे जाऊन गळ्याला चाकू लावला व गळ्यातील दागिने काढ असे सांगितले. ही महिला गळ्यातील दागिने काढत असतानाच आणखी दोघेजण तिथे आले.
यातील एकाने तिचे तोंड दाबून तिचा मोबाईल हिसकावून घेतला व तिला कपडे काढण्यास सांगितले. तिने त्यास नकार दिला असता, तिची ओढणी फेकून दिली व तिचा टॉप फाडून टाकला. तसेच तिची पॅन्ट उतरवत तिला अर्धनग्न करून तिचे फोटो काढले.
हे तिघेही 25 ते 32 या वयाच्या दरम्यानचे होते अशी फिर्याद या महिलेने बारामती तालुका पोलिसांना दिली. त्यावरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांचा बारामती तालुका पोलीस शोध घेत आहेत. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.











