बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक केव्हा झाली निकालही लागला. निकाल लागल्यापासून आजपर्यंत काही गोष्टी अजूनही चर्चेत आहेत, त्या म्हणजे कोणाचं कोणी काम केलं? सहानुभूतीच्या वादळात सत्तेचा लाभ मिळूनही निष्ठेचा दिवा मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना उजळता आलाच नाही, मात्र काही गावांमध्ये हा दिवा मिणमिणत राहिला आणि त्याचीच चर्चा आजही होतेय.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रचाराची सुरुवात जशी झाली, तशी जिरायती गावांची चर्चा वाढली. या गावांमध्ये सुप्रिया सुळेंना सहानुभूती अधिक आहे आणि मतदानातही ते माप अधिक पडेल याची सुरुवातीपासूनच चर्चा सुरू होती, ती शेवटपर्यंत अखंड राहिली आणि मतदानातही ती तशीच दिसून आली. अजित पवारांनी जिरायती भागातील सर्वच गावातील कार्यकर्त्यांना गेल्या 30-35 वर्षात मोठी ताकद दिली. अजित पवारांविषयीच्या निष्ठेच्या लढाईत मात्र ही ताकद सुमार झाली.
आजही उठून दिसतायेत ती गावे म्हणजे सुपे मेडद गटात फक्त बाबुर्डी! वरच्या भागात मासाळवाडी पळशी ही गावे! वस्तुतः निवडणुकीच्या रणसंग्रामात ज्या जनाई उपसा सिंचन योजनेचे नाव गाजत होते त्या गावांचा ज्यांना लाभ मिळाला त्या गावातून अजित पवारांना मताधिक्य मिळालेच नाही मात्र ज्या गावाला भांडल्याखेरीज व एरव्ही देखील जनाई उपसा सिंचन योजनेचा थेंबही वाटायला येत नाही, त्या बाबुर्डी गावाने मात्र कमाल केली.
बाबुर्डी गावात तीन मतदान केंद्रावर 1964 मतदारांनी मतदान केले त्यापैकी 300 मतांचे मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळाले. गावच्या युवा सहकाऱ्यांनी या भागाची खिंड अखंडित लढवली. सगळीकडेच जनभावनेचा जोर होता, शरद पवारांना सोडायचं नाही ही जनभावना मतदानाचा उच्चांक घेऊन जात असताना या सगळ्या पोरसवद्या युवक कार्यकर्त्यांचं आवाहन गावानं मनावर घेतलं आणि या गावात सुनेत्रा पवारांना मताधिक्य मिळालं.
पराभवानंतर आत्मचिंतनाची वेळ येईल तेव्हा या गावाचा नक्की विचार होईल, राजकारणात हार जीत असतेच, पण निष्ठेला तेवढेच महत्त्व असतं. साहजिकच युवकांनी नेटाने लढवलेल्या या खिंडीचा देखील विचार अजित पवारांचा पक्ष करेलच, पण वादळात एखादा मिणमिणणारा दिवा अधिक उजळून दिसतो तसाच काहीचा प्रकार या सुपेच्या बारा वाड्यावर त्यांच्या बाहेरच्या भागात बाबुर्डीच्या रूपाने दिसून आला.
प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मागे अडचणीतही लोक उभे राहतात, पण त्या लोकांच्या पाठीमागे त्यांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी उभे राहिले पाहिजे हा संदेश मात्र या निमित्ताने दिला आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावातील कारभाऱ्यांना अजित पवारांनी सातत्याने ताकद दिली. त्यांची ताकद गावगाड्यात पूर्वी सातत्याने दिसून आली. नंतरच्या काळात ती गावाच्या विकासाबरोबर कार्यकर्त्यांच्याही स्वआर्थिक विकासात परावर्तित झाली आणि राजकारणावर श्रीमंत झालेले लोक सामान्य लोकांच्या डोळ्यावर येतात..
तेच तेच कार्यकर्ते भरल्या गावात पुन्हा पुन्हा दिसू लागल्याने व राजकारणातील पदांच्या भाकऱ्या परतवल्या न गेल्याने लोकांच्या मनात जी नकारात्मकता तयार झाली, ती शरद पवार गटाने उभा केलेल्या मलिदा ग्यांग या नावाच्या नकारात्मक स्वरूपात उभारीला आली. त्यामुळेच इतर गावात गाव पुढारी विषयीची नाराजी उफाळून आलेली मतदानातही दिसली, त्या पार्श्वभूमीवर बाबुर्डी सारखी अखंड जिरायत गावे मात्र उठून दिसली.
बाबुर्डी गावात अगदी कोरोना पासूनचा जरी आढावा घेतला, तरी या युवक कार्यकर्त्यांनी गावाची नाळ जोडली, तीच नाळ शरद पवार नावाच्या भयंकर लाटेतही गावाने कायम ठेवली; इथल्या युवकांनी केलेला प्रचार आणि लोकांना अजित पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे केलेले आवाहन लोकांनी मनावर घेतले. ते का घेतले असेल? याचं आत्मचिंतन झालं पाहिजे. कारण प्रश्न आहे तो नैतिकतेचा, ज्या ज्या गावांनी अजित पवारांना साथ दिली, तेथील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे चीज होणार का?











