युवराज जाधव, सांगली
महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष असतानाच राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच सहकारी बँकाही आता केंद्र सरकारच्या नजरेत आल्या आहेत. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील काही सहकारी बँकांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आता नजर पडली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांनी दुष्काळ निधीवर डल्ला मारण्याची शक्यता असल्याने सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 219 शाखांची चौकशी सुरू आहे. तब्बल 48 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक गुरुवारपासून जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये चौकशी करत आहे. या चौकशीत नेमक्या कोणत्या कोणत्या शाखेतील कर्मचाऱ्यांनी दुष्काळ निधीचा अपहार केला याची माहिती समजणार आहे.
बँकेच्या शाखेत विविध प्रकारची शासनाकडून आलेली अनुदाने विमा रक्कम जमा होते त्यातील अनेक खात्यावरील रक्कम काढले जात नाही, या रकमेचा व दुष्काळी निधीचा 56 लाख रुपयांचा अपहार करून ती काढण्यात आल्याचा प्रकार तासगावच्या मार्केट यार्ड शाखेत आणि निमणी सिद्धेवाडी या शाखेतही पुढे आला आणि इथूनच या बँकेच्या चौकशीला सुरुवात झाली.
या घटनेने संचालक मंडळ देखील खडबडून जागे झाले. मार्केट यार्ड शाखेतील जबाबदार असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. यातील एका ठिकाणची 40 लाख रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांनी भरली, परंतु ती 100% रक्कम भरण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत बँकेवर रिझर्व बँकेची कारवाई नको म्हणून संचालक मंडळाने ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे.











