बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत सहयोग भवनात तालुक्यातील १५० दिव्यांगांना इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले.. प्रत्येकाची चौकशी करू लागले.. एकाने सांगितले, दादा मी बीएससी बीएड आहे.. अपघातात मणक्याला इजा झाली.. चालता येत नाही… लग्न झालेले नाही.. मी आणि आई दोघेच असतो, उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.. दादांनी लागलीच बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना बोलावले..
आज संतुलन फौंडेशनच्या वतीने बारामती तालुक्यातील दिव्यांगांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकली भेट देण्यात आल्या. यावेळी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील आदींसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाच जणांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकली वाटप केल्या. यावेळी दादांनी प्रत्येकाची विचारपूस केली. ही चौकशी करताना वंजारवाडी येथील दिव्यांग कल्याण चौधर यांची चौकशी दादा करत होते.
त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी शिक्षक म्हणून काम करत होतो, पण अचानक अपघात झाला. मणक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे चालता येणे बंद झाले. आता घरीच थांबून असतो. दादांनी विचारले की, पत्नी काय करते? त्यावर माझे लग्न झाले नाही, मी व आई दोघेच असतो असे त्यांनी सांगितले. दादा काही वेळ थांबले.
चौधर यांनी दादांना विनंती केली की, दादा मी बीएससी बीएड आहे. मला जर कोठे नोकरी मिळाली तर मी व आई व्यवस्थित जगू शकतो असे त्यांनी सांगितले, पण नोकरीचा प्रश्न गंभीर असल्याचे ते म्हणाले. पण काही क्षणातच दादांनी सचिन सातव यांना बोलावून घेतले.
दादांनी सातव यांना विचारले की, बॅंकेत दिव्यांगांसाठी जागा आहेत का? सचिन सातव यांनी त्यांना माहीती दिली आणि दादांनी त्यांना चौधर यांचा अर्ज घेऊन नोकरीत सामावून घेण्याची सूचना केली आणि कल्याण मल्हारी चौधर यांचा प्रश्न मार्गी लावला.











