कुडाळ : महान्यूज लाईव्ह
लग्नाचं वय निघून गेलं की, कोणत्याही वयात आणि कोणाशीही लग्न करण्याची तयारी असा अधिक वयाचा नवरदेव दाखवतो आणि नेमका त्याचाच गैरफायदा घेऊन त्यांना लुटणाऱ्या टोळ्या आता सक्रिय झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलिसांनी अशीच टोळी पकडली.
ज्यामध्ये त्यांनी 42 वर्षाच्या नवरदेवाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ही घटना कुडाळ तालुक्यात घडली. यात पोलिसांनी तीन पुरुष व चार महिलांना अटक केली असून, अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर व सातारा येथून या सर्वांना ताब्यात घेतले.
ही टोळी सराईत असून या टोळीने कुडाळ तालुक्यातील 42 वर्षीय नवरदेवाकडून दीड लाख रुपये घेऊन त्याचे दिपाली पाटील नावाच्या एका मुलीशी लग्न लावून दिले. मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ही नवरी पळून गेली आणि नवरदेवाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरून कुडाळ पोलिसांना तब्बल 13 जणांविरोधात दाखल करण्यात आला होता.
कुडाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 42 वर्षीय तक्रारदार नवरदेवाने मागील चार वर्षापासून स्थळ शोधण्यास सुरुवात केली होती. या नवरदेवाची ओळख कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील अजिज नाईक व कुडाळ तालुक्यातील दळवीवाडी येथील महेश श्रीकांत पाटकर यांच्याशी झाली होती.
त्यांनी आमच्याही पाहण्यात एक चांगली मुलगी असल्याचे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर नवरदेवाला कुडाळ येथील कोर्टाशेजारी पाटेश्वर मंदिरात बोलवून नाईक याने चार पुरुष व तीन महिलांसमवेत मुलगी दाखवली. या मुलीने तिचे नाव रूपाली दत्ताजी पाटील असे सांगितले होते.
नवरदेवाचा विश्वास बसल्यानंतर त्याने नाईक व पाटकर यांना लग्न कार्यक्रमाचा खर्च म्हणून एक लाख चाळीस हजार रुपये दिले. त्यांनी या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिले. मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ही नवरी पळून गेल आणि तक्रारदार नवरदेवाने पोलिसांकडे धाव घेतली.











