दौंड : महान्यूज लाईव्ह
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, शहरात साखळी उपोषण, आमरण उपोषण, पुढाऱ्यांना गावबंदी अशी तीव्र आंदोलने सुरु आहेत. मात्र दुसरीकडे दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांनी आपला वाढदिवस थाटामाटात उत्साहात साजरा करतात, निदान आमदार कुल यांनी तरी समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन हे टाळणे गरजेचे होते. अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केली.
दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांचा ३० ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने कुल यांच्या समर्थकांनी चौकाचौकात शूभेच्छा बॅनर लावून तसेच घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांचा वाढदिवस मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर टिकेचा विषय बनला आहे. वैशाली नागवडे यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी आमदार राहुल कुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र वैशाली नागवडे यांनी यासंदर्भात प्रसिध्द केलेलं हे पत्र सध्या चर्चेत आहे. यामध्ये नागवडे यांनी नमूद केले आहे की, आम्हाला दौंडकरांना आपल्याकडून अपेक्षा होत्या, कारण आपली एक अभ्यासू व प्रश्नांची जाण असलेला आमदार म्हणून ख्याती आहे असे समर्थक सतत म्हणतात, परंतु आपण व आपले काही कार्यकर्ते आपला वाढदिवस साजरा करण्यात दंग राहिलात. या गोष्टीमुळे एक मराठा भगिनी या नात्याने मी तीव्र शब्दात माझी नाराजी व्यक्त करत आहे.
आपला एक समाज बांधव श्री. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी जीवन -मरणाची लढ़ाई लढ़त असताना आपण इकडे आपला वाढदिवस साजरा करीत आहात ही बाब समाजाभिमुख आहे का ?कारण आपण आमचे लोकप्रतिनिधी आहात व मराठा समाजाचेपण आहात. मराठा आरक्षणाला फक्त मराठा लोकप्रतिनिधी नाही तर सर्व समाज बांधव व विविध संघटना, विविध पक्षाचे नेते ही पाठिंबा देत आहेत.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण आरक्षणासाठी बसलेल्या कार्यकर्त्यांबरोबर उपोषणासाठी बसला असता, तर आम्हांला दौंडच्या जनतेसाठी अभिमानाची गोष्ट वाटली असती व आम्हांला त्याचा सार्थ अभिमान वाटला असता. परंतू आपण समाजहित लक्षात न घेता वाढदिवस साजरा करण्यात मग्न राहिलात. याबाबत मी एक मराठा समाजाची भगिनी या गोष्टीची जाहिरपणे नाराजी व्यक्त करते. पुढचा काळ कसोटीचा आहे , तरी आपण मराठा समाजाबरोबर रहाल ही अपेक्षा.











