सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : मिशन बारामतीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून, बारामती लोकसभेचा गढ जिंकण्यासाठी मजबूत तयारी केली असल्याचे संकेत भाजपाने दिले आहेत. आता बारामती लोकसभेचा 2024 चा खासदार भाजपचा असेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
मिशन बारामतीसाठी सगळ्यांनी सज्ज रहा, असे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. इंदापूर येथील भाजपाच्या सुपर 100 पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीप्रसंगी अंकिता पाटील बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकोपयोगी असे धाडसी निर्णय घेतले आहेत. परिणामी, आगामी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजप 300 पेक्षा अधिक जागा जिंकणार असून, बारामती लोकसभा मतदारसंघाचा आगामी खासदार भारतीय जनता पार्टीचा असेल असे त्या म्हणाल्या.
महाविजय २०२४ अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामती लोकसभा प्रवास होणार आहे. त्याअंतर्गत इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सुपर १०० पदाधिकाऱ्यांची बैठक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.











