राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीला येत्या २४ सप्टेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. ऐतिहासिक व सामाजिक वारसा लाभलेला पुण्यात या निमित्ताने ऐतिहासिक सत्यशोधक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा मानणारे, पुरोगामी आणि सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या संमेलनात सहभागी होऊन महात्मा फुलेंच्या ऐतिहासिक सत्यशोधक चळवळीचे साक्षीदार व्हा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले.
येत्या रविवारी (ता. २४) सायंकाळी पाच वाजता पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या मैदानात सत्यशोधक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी अधिक माहिती दिली.
शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी इतिहास संशोधक प्राध्यापक मा. म. देशमुख, हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच आमदार रोहित पवार, बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही. व्ही. जाधव, आयपीएल राज्य पदाधिकारी ऍड. वासंती नलावडे, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक विठ्ठल सातव, प्रा. डॉ. जे. के. पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सत्यशोधक समाज स्थापनेमागील उद्देश, विचारधारा व आजची प्रासंगिकता यासह सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणे हीच व्यवस्था परिवर्तनाची पूर्वशर्त होय या दोन विषयांवर चर्चासत्र होणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. बहुजन समाजाला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हा सत्यशोधक समाज स्थापन केला होता. महात्मा फुलेंनंतर सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेथे, दिनकरराव जवळकर इत्यादींनी ही वैचारिक चळवळ पुढे सुरु ठेवली होती.
सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या जात आहेत. फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाज स्थापनेला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सत्यशोधक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाय फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील अनुयायांना या संमेलनासाठी आम्ही निमंत्रित करत असल्याचेही प्रविण गायकवाड यांनी सांगितले आहे. संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, मौर्य क्रांती संघ, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, लहूजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा आदी संघटना यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.











