जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
नसरापूर : नसरापूर (ता. भोर) भागातून मागील काही दिवसांत चोरी गेलेल्या दुचाक्या अखेर मिळून आल्या असून या चोरी करणारा एका अल्पवयीन मुलगा आहे. आरोपी बालगुन्हेगार याला बाल न्यायालयात हजर करण्याची पुढील कारवाई राजगड पोलीस करत असून त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी मिळून आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चेलाडी फाटा ब्रीज खालुन ब-याच दिवसापासून मोटार सायकलची चोरी होत होती. त्या अनुशंगाने राजगड पोलीस तपास करीत होते. ७ सप्टेंबर रोजी फौजदार सुतनासे, सहायक फौजदार ढावरे, हवालदार कुदळे, कोंढाळकर असे नाकाबंदी करीत असताना चेलाडी उड्डाणपुलाखाली एक अल्पवयीन मुलगा बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटार सायकल चालवित येत असलेला दिसला.
त्यास थांबवून त्याचे ताब्यातील असलेली डिस्कव्हर बजाज मो.सा नं एमएच १२ जीडी १६८२ या गाडीची कागदपत्रे व लायसन्स पाहण्यासाठी मागीतले. त्याने कागदपत्र व लायसन्स नसलेबाबत सांगितले. पोलीसांनी त्याच्या वडीलांना बोलावून घेवून त्यांचेसमक्ष सदर अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली.
त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकल नंबर एमएच/ १२ / जीडी / १६८२ ची खात्री करता सदर नंबर हा होंडा डिओ स्कुटरचा असल्याचे दिसून आले. मोटार सायकल चोरीची असल्याच्या संशयावरुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्याने ६ मोटारसायकल सदर अल्पवयीन मुलाने चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले असून त्यातील ४ मोटार सायकल वापरुन वापरुन पेट्रोल संपल्यानंतर सोडून दिल्याचे सांगितले.
त्याच्या जवळ सापडलेल्या डिस्कव्हर बजाज एमएच/ १२ / जीडी / १६८२ ही गाडी कोणाची आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत. याच अल्पवयीन मुलाचे घरी देखील स्प्लेंडर नं एमएच / १२ / एम.ई / ९७४४ ही मिळून आली आहे. ती गाडी ८ सप्टेंबर रोजी चेलाडी उड्डाणपुलाखालून चोरी गेली होती. पोलीसांनी सर्व मोटारसायकली हस्तगत करुन संबंधीतांना परत देण्याची कारवाई सुरु केली आहे. दरम्यान बालगुन्हेगाराला बाल न्यायालयात हजर करण्याची पुढील कारवाई राजगड पोलीस करत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भाईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सुतनासे, सहायक फौजदार ढावरे,हवालदार कुदळे,कोंढाळकर यांनी केली असुन पुढील तपास ढावरे हे करीत आहेत.











