विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यमाने 24 ऑगस्ट 2020 ते 2 सप्टेंबर 2020 या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात रोजगारानिमित्त ऑनलाईन मुलाखती घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील 12 उद्योगांनी सहभाग घेतला असून, या कंपन्यांमध्ये 1934 वेगवेगळ्या जागा भरण्यात येणार आहेत. कंपन्यांनी ही रिक्तपदे कौशल्य विकास व रोजगार विभागाला कळविली आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ओढवलेल्या बेरोजगारीच्या संकटामुळे बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळावा व मुलाखतीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या रिक्तपदांसाठी दहावी पेक्षा कमी शिक्षण असणारे तसेच 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेचा पदवीधर, आय.टी.आय, डिप्लोमा व इंजिनिअरिंग अशा सर्व उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे. एम्लॉयमेंट कार्यालयाकडे ऑनलाईन नाव नोंदणी केलेले सर्व उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. तसेच ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नसेल त्यांनी राज्य शासनाच्या WWW.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर आपली नविन नोंदणी करुन घ्यावी व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्य्क आयुक्त वि.वि.कानिटकर यांनी केले आहे.











