सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
ज्या अपंगाला घरकुल नाही अशा अपंग बांधवांनी तात्काळ इंदापूर पंचायत समितीच्या सबंधित विभागाकडे घरकुल मागणीसाठी नाव नोंदणी करावी व प्रस्ताव दाखल करावेत. जे अपंग बांधव घरकुलापासून वंचित असतील त्यांना निश्चित घरकुलाचा लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शनिवारी ( दि.१९ मार्च ) इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अपंग प्रमाणपत्र वाटप व संजय गांधी निराधार योजना, इंदापूर तालुका अर्ज वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. तहसील कार्यालय,पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रताप पाटील, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ, सोलापूरचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,नगरसेवक अनिकेत वाघ, स्वप्निल राऊत, नगरसेविका हेमलता माळुंजकर, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, वसंत माळुंजकर, अनील राऊत, रमेश शिंदे, गफुरभाई सय्यद, महादेव लोखंडे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे बाबासाहेब पाडुळे, तालुकाध्यक्ष आण्णा गायकवाड, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, शहराध्यक्षा उमा इंगोले, इंदापूर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संतोष खामकर, डॉ.सुहास शेळके, डॉ.एकनाथ चंदनशिवे,डॉ.विनोद राजपुरे आदी उपस्थित होते.
भरणे पुढे म्हणाले आज या कार्यक्रमातून ३०० लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यात ७ ते ८ हजारच्या दरम्यान संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. असे असले तरी आजही अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत. योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना महिन्याला जे अर्थसहाय्य मिळते त्यातून त्यांचा उदरनिर्वाह किंवा औषधोपचारासाठी मदत होते. सागर मिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही योजना गावपातळीवर जावून राबवावी असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी अपंग बांधवांसाठी इंदापूर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत मार्फत ५ टक्के निधी वितरीत केला जात असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांनी केले.











