बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सोलापूर दौरा आणि माळशिरस मध्ये असेल तर शिवरत्न बंगला हे आजवरचे समीकरण आज पवार साहेबांनी शिवरत्न ऐवजी शिवतीर्थ बांगला भेट दिली आणि तिथेच कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर आज प्रथमच शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याला भेट दिली. सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड झपाट्याने वाढत असून सोलापूर मधील कोरोना चा झालेला फैलाव राज्य शासनासाठी देखील चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर दिला असतानाच काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विनंती केली. आज शरद पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संयुक्तपणे सोलापूरचा दौरा केला. शरद पवार यांच्या कन्हेर दौऱ्याचीही बरीच चर्चा होती. आज त्यांनी कन्हेर वरून माळशिरस कडे पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश पाटील यांचे सांत्वन केले.
यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी शंकरराव देशमुख यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. ही चर्चा शिवतीर्थ या बंगल्यावर झाली. आज पर्यंत बऱ्याचशा भेटीगाठी शिवरत्न बंगल्यावर झाल्या होत्या, अर्थात शिवरत्न बंगला हा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा आहे हे सर्वांना माहीत आहे, परंतु लोकसभेच्या निवडणुकीपासून मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीची साथ जवळपास सोडलीच आहे. त्यामुळेच आज पवार यांच्या दौऱ्यात नेमके ते कुठे जातात याची उत्सुकता कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. रामदास देशमुख व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरराव देशमुख यांचा शिवतीर्थ बंगला या दौऱ्याचे केंद्रस्थान ठरला.











